साधारणत: तीन दशके देखभाल दुरुस्तीपासून वंचित राहिलेल्या जुन्या छपाई यंत्राच्या मदतीने चलार्थ मुद्रणालयातील कामगारांनी नोटा बंदीच्या काळात रात्रंदिवस प्रचंड मेहनतीने तब्बल ८६३ दशलक्ष नोटांची छपाई करत विक्रम नोंदविला आहे. चलन छपाईच्या नियमित कामात या कालावधीत ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ करण्यात आली. मुद्रणालयातील निवृत्त कामगारही मदतीला धावून आले. घरचे लग्न व तत्सम कार्यक्रम बाजूला ठेवत कामगार चलन तुटवडय़ावर मात करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहेत.

देशात एकूण चार मुद्रणालये आहेत. त्यात नाशिक व देवासचे मुद्रणालय भारत सरकारच्या, तर कर्नाटकातील म्हैसूर व बंगालमधील सालगोणी ही रिझव्‍‌र्ह बँकेच्या अखत्यारीतील मुद्रणालये आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेच्या मुद्रणालयात अत्याधुनिक छपाई यंत्रणा आहे. नाशिकच्या मुद्रणालयात १९८५ मध्ये बसविलेल्या छपाई यंत्रणेची देखभाल दुरुस्ती आजतागायत केली गेलेली नाही. या स्थितीत ५०० व एक हजारच्या नोटा रद्दबातल झाल्यानंतर चलन छपाईची मोठी जबाबदारी या मुद्रणालयावर आली. दैनंदिन १५ दशलक्ष नोटा छपाईची क्षमता या काळात २० दशलक्षपर्यंत विस्तारली गेली. सुरुवातीचे पंधरा दिवस २२०० कामगारांनी मोबदला न घेता जादा काम केले. सुटय़ा पैशांची चणचण दूर करण्यासाठी ५००, १००, ५० आणि २०च्या तब्बल ८६३ दशलक्ष नोटा छापण्यात आल्याचे प्रेस मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी सांगितले. त्यात ५००च्या २९० दशलक्ष नोटांचा अंतर्भाव आहे. हवाई दलाच्या मदतीने त्या देशभरात तातडीने वितरित केल्या जात आहेत. यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने ती बंद पडण्याचे प्रकार घडले. कामाचा ताण वाढत असल्याने २५ ते ३० निवृत्त कामगारांना मदतीला बोलावत चोवीस तास व सुटीच्या दिवशीही अविरतपणे छपाई सुरू आहे. पूर्वी भासणारा शाईचा तुटवडा आता दूर झाला. आजवर दुर्लक्षित राहिलेल्या मुद्रणालयाचे महत्त्व सरकारच्या लक्षात आले. त्यामुळे भविष्यात हे मुद्रणालय टिकायला हवे आणि आमच्या प्रश्नांची सोडवणूक व्हायला हवी, अशी कामगारांची भावना आहे. बदलत्या तंत्रज्ञानावर आधारित जुन्या यंत्रणेत बदल करण्याची गरज आहे. नवीन यंत्रणा कार्यान्वित झाल्यास नोटांची गुणवत्ता व उत्पादकता वाढणार असल्याची बाब मजदूर संघाने अर्थमंत्र्यांची भेट घेऊन मांडली. नाशिक येथील प्रस्तावित पेपर मिलचा सर्वेक्षण अहवाल सकारात्मक आहे. त्यावर सकारात्मक निर्णय होण्याची कामगारांना अपेक्षा आहे.

नाशिकमध्ये चलन तुटवडय़ाचे संकट ५० दिवस पूर्ण होत असताना कमी झालेले नाही. अनेक राष्ट्रीयीकृत बँकांच्या तिजोरीत खडखडाट आहे. जिल्’ाातील ८० टक्के एटीएम आजही बंद आहेत. सरकारच्या नियमानुसार राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांना ग्राहकांना आठवडय़ाला २४ हजार रुपये देणे अवघड झाले आहे. एसबीआयने बदलण्यासाठी दिलेल्या जीर्ण नोटा रिझव्‍‌र्ह बँकेने परत पाठवत त्याच वापरण्याचे सूचित केले. या काळात कांदा, टोमॅटो व कृषिमालाची मातिमोल भावाने विक्री झाली. त्यातही व्यापाऱ्यांनी जुन्या रद्दबातल नोटा शेतकऱ्यांच्या माथी मारत काळ्याचे पांढरे करून घेतले. सर्वसामान्य नोकरदार, जिल्हा बँकेत वेतन अडकलेले शिक्षक, शेतकरी असे सर्व घटक भरडले गेले आहेत.