नाशिकमध्ये वाटाण्याचा दाणा श्वसननलिकेत अडकल्याने एक वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली. सुजय जयेश बिजूटकर असे या बालकाचे नाव असून दोन दिवसांपूर्वीच थाटामाटात त्याचा पहिला वाढदिवस साजरा झाला होता.

सिडको येथील महाराणा प्रताप चौक परिसरात राहणाऱ्या सुजय जयेश बिजूटकर या चिमुकल्याने याने शुक्रवारी सकाळी जमिनीवर पडलेला वाटाण्याचा दाणा गिळला. त्याच्या आईला हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने मुलाला स्थानिक डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरने काही औषधंही दिली आणि थोड्या वेळाने त्याला बरे वाटेल, असे सांगत मुलाला घरी घेऊन जायला सांगितले. घरी आल्यावर सुजय झोपून गेला. अकराच्या सुमारास त्याची आई मुलाला उठवण्यासाठी गेली असता सुजयचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. श्वसननलिकेत दाणा अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

सुजयचा १४ फेब्रुवारी रोजीच पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला होता. थाटामाटात हा सोहळा पार पडला होता. सुजयची आई जिल्हा परिषदेत नोकरीला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

काही दिवसांपूर्वीच नाशिकमधील चांदगिरी गावात दहा रुपयांचे नाणे गिळल्याने साडेचार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सिडको परिसरात फुगा गिळल्यामुळे आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला होता. वीर विनोद जयस्वाल, असे मृत बालकाचे नाव होते.