नाशिक : शहरासह जिल्ह्य़ात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आपल्या परिसरात करोना उपचार केंद्र सुरु करण्याची मागणी त्या त्या भागातील नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून के ली जात असतांना पंचवटीतील श्रीकृष्णनगरात मात्र करोना उपचार केंद्रविरोध होत आहे. हे केंद्र निवासी इमारतीत असल्याने रहिवाशांना या केंद्रामुळे आपणासही करोना संसर्ग होण्याची भीती सतावत आहे. त्यामुळे पंचवटीतील आधारशीला करोना उपचार केंद्र बंद करावे किं वा अन्य ठिकाणी स्थलांतरीत करावे, अशी मागणी आमदार नितीन पवार यांच्यासह परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिक धास्तावले आहेत. संसर्ग झाल्यास रुग्णालयांमध्ये खाटही मिळत नाही. खासगी रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांवरील उपचारासाठी भरमसाठ खर्च होत असल्याने जावे तरी कु ठे, असा प्रश्न रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसमोर आहे. ग्रामीण भागात तर करोना उपचार केंद्रांची संख्या अतिशय कमी असल्याने रुग्णांचे अधिकच हाल होत आहेत. शहरात नवीन करोना उपचार केंद्र सुरु करण्यासाठी जागा मिळण्याची वानवा आहे. अशा परिस्थितीत पंचवटीतील श्रीकृष्ण नगरात सप्तश्रृंगी अपार्टमेंट या रहिवासी इमारतीत करोना उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे  केंद्र डॉ. अग्रवाल यांच्या आधारशिला रुग्णालयात सुरू करण्यात आले असून दुसऱ्या व्यक्तीला चालविण्यासाठी देण्यात आले आहे. हा संपूर्ण परिसर निवासी असून करोना उपचार केंद्र असलेल्या इमारतीमध्ये १० सदनिका आहेत. इमारत परिसरात येण्या जाण्याचा एकच रस्ता आहे.

या केंद्राची मान्यता रद्द करा अथवा अन्य ठिकाणी स्थलांतरीत करावे, अशी मागणी इमारतीतील रहिवाश्यांनी केली आहे. कळवण-सुरगाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार नितीन पवार यांचे निवासस्थानही याच परिसरात आहे. त्यांनीही या केंद्राला विरोध दर्शविला आहे. प्रभागातील चारही नगरसेवकांसह आमदार पवार यांनी या केंद्रामुळे उद्भवणाऱ्या समस्येकडे महापालिका आयुक्तांचे निवेदनाव्दारे लक्ष वेधले आहे. याशिवाय वैद्यकीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पंचवटी पोलिसांनाही निवेदन देण्यात आले.