नाशिक : छत्रीद्वारे (पॅराशूट) हवाई कसरतीच्या प्रशिक्षणासाठी हेलिकॉप्टरमधून झेपावलेल्या एका अधिकाऱ्याचे पॅराशूट जोरदार  वाऱ्यामुळे भरकटले. हा प्रकार बुधवारी   आगरटाकळी परिसरात घडला.   भरकटलेले पॅराशूट बाभळीच्या झाडात अडकल्याने हा अधिकारीही काही वेळ झाडावर अडकला होता.

अखेर छत्रीचे दोर कापून तो शेतकऱ्यांच्या मदतीने खाली उतरला. या घटनेत त्यांना कोणतीही इजा झाली नाही. बाभळीच्या झाडात अडकलेली छत्री अग्निशमन दलाने झाडाच्या फांद्या कापून काढली. मेजर मुकेश असे या अधिकाऱ्याचे नांव असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

गांधीनगर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर वैमानिकांना प्रशिक्षण देणारे केंद्र असून सरावासाठी केंद्रातून दररोज हेलिकॉप्टरची अनेक उड्डाणे होतात. लष्करातील पॅराशूट रेजिमेंटचे ‘पॅराट्रुपर्स’ (अधिकारी-जवान) हे देखील हेलिकॉप्टरमधून उडी मारण्याच्या सरावासाठी केंद्रात येत असतात. अशाच सरावादरम्यान ही घटना घडली. बुधवारी सकाळी मेजर मुकेश यांच्यासह काही पॅराटुपर्सने १३ हजार फूट उंचीवर असताना हेलिकॉप्टरमधून उडी घेतली.  हवाई छत्रीच्या साहाय्याने निश्चित केलेल्या जागेवर सर्व जण उतरणे अपेक्षित होते. परंतु, वाऱ्याचा हवाई कसरतीवर परिणाम झाला.

मेजर मुकेश यांची छत्री भलतीकडेच भरकटली. ही बाब केंद्रात प्रशिक्षणाचे नियंत्रण करणाऱ्यांच्या लक्षात आली. भरकटलेली हवाई छत्री उपनगर लगतच्या आगरटाकळी परिसरात अमित कोठे यांच्या शेतातील बाभळीच्या झाडावर अडकली. अंदाजे २० फूट उंच झाडावर मेजर मुकेश हे अडकून पडले. हे पाहून शेतकऱ्याने धाव घेऊन त्यांना आधार दिला.  त्यांच्या  हाताला किरकोळ खरचटले, असे अग्निशमन अधिकारी इकबाल शेख यांनी सांगितले.  अग्निशमन दलाने झाडांच्या फांद्या कापून पॅराशूट खाली उतरविले. बाभळीच्या काटय़ांनी हवाई छत्रीचे काहीअंशी नुकसान झाले. लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांना आपल्या वाहनातून केंद्रात नेले.

पॅराटुपर्सला हवेत झेपावण्याचे लक्ष्य

हवाई छत्रीद्वारे प्रशिक्षण देणारे मुख्य केंद्र आग्रा येथे आहे. पॅराशूट रेजिमेंटमधील पॅराट्रुपर्सला (हवाई छत्रीधारी अधिकारी-जवान) दरवर्षी काही विशिष्ट प्रमाणात हेलिकॉप्टर, विमानातून उडय़ा घेण्याचा सराव करावा लागतो. हे लक्ष्य गाठण्यासाठी पॅराटुपर्स नाशिकच्या लष्करी हवाई प्रशिक्षण केंद्रात येतात. या ठिकाणी प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा हेलिकॉप्टरमध्ये नियमित सराव सुरू असतो. या हेलिकॉप्टरमधून पॅराट्रुपर्सला हवेत उडय़ा घेण्याचे लक्ष्य पूर्ण करता येते, असे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.