नातेवाईकांचा आरोप रुग्णालयास अमान्य

शहरातील मविप्र रुग्णालयाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्रात रुग्णाला लावलेल्या व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. हे सर्व आरोप रुग्णालयाने फेटाळले असून व्हेंटिलेटरमध्ये झुरळ असल्याचे मात्र त्यांनी मान्य केले आहे.

पंचवटीतील रामकुंड परिसरातील चतुसंप्रदाय आखाडय़ात पाच दिवसांपूर्वी अंजली बैरागी (४२) यांनी विष प्राशन केल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती बिघडत असल्याने त्यांना आडगांव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.  सोमवारी रात्री प्रकृती अधिकच खालावली. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने व्हेंटिलेटर लावण्यात आले. एक तास त्या व्हेंटिलेटरच्या मदतीने श्वास घेत होत्या. रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान त्यांचा उपचारास प्रतिसाद मिळेनासा झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली. बैरागी यांच्यासंदर्भात पोलीस ठाण्यात नोंद असल्याने पोलिसांनाही कळविण्यात आले. पोलीस येईपर्यंत बैरागी यांचा मृतदेह व्हेंटिलेटरसह आहे त्या स्थितीत ठेवण्यात आला.

बैरागी यांचे नातेवाईक १०वाजता मृतदेहाजवळ गेले असता त्यांनी व्हेंटिलेटरमध्ये झुरळ असल्याचा दावा करत त्या ठिकाणी गोंधळ घातल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. बैरागी यांचे नातेवाईक आक्रमक झाल्याने पोलिसांना बोलावून  मृतदेह जिल्हा रुग्णालयाकडे विच्छेदनासाठी सुपूर्द करण्यात आला. बैरागी यांच्या नातेवाईकांनी अंजली यांचा मृत्यू व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने झाल्याचा आरोप केला. हे आरोप रुग्णालय व्यवस्थापनाने फेटाळले आहेत.

बैरागी यांचा मृत्यू व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने श्वास घेण्यात अडचण आल्याने झालेला नाही. वास्तविक हा मृत्यू ऑरगन पॉईंजनिंग अर्थात विषबाधेने झाला आहे. बैरागी यांचा मृत्यू आठ वाजता झाला. तोपर्यंत नातेवाईकांचा कोणताही आक्षेप नव्हता. १० वाजेनंतर अन्य नातेवाईक आल्यानंतर त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी झुरळ होते, परंतु ते जिवंत होते.  रुग्णाच्या उपश्वासातून जाणाऱ्या नळीच्या दिशेने झुरळ होते. ते जर श्वास नलिकेशी जोडले गेले असते तर व्हेंटिलेटरमधील वायूच्या दाबाने तेथेच मेले असते. झुरळ त्या ठिकाणी कसे आले, हे माहिती नाही पण ते होते हे मान्य.

डॉ. मृणाल पाटील, अधिष्ठाता, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय.