‘सोशल नेटवर्किंग फोरम’च्या जलाभियानात केळबारी टँकरमुक्त

उन्हाळ्यात पाण्याची वणवण होतीच, पण पावसाळ्यातही खूप हाल होत होते. त्यात यंदा तर दुष्काळामुळे परिस्थिती अधिक गंभीर असण्याची भीती. मात्र सोशल नेटवर्किंग फोरमने जिव्हाळा ग्रुपच्या सहकार्याने पाण्याची चिंता सोडवली आणि केळबारी ग्रामस्थांचा जीव भांडय़ात पडला. फोरमच्या माध्यमातून हे १२ वे गाव टँकरमुक्त झाले आहे.

सोशल फोरमचे मार्गदर्शक आणि जिव्हाळा ग्रुपचे संस्थापक डॉ. ए. के. पवार यांच्या स्मरणार्थ या प्रकल्पाचे लोकार्पण डॉ. अभिमन्यू पवार, अध्यक्ष डॉ. डी. एम. पवार, सचिव मधुकर फटांगरे, किशोर गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. टँकरमुक्त गाव उपक्रमात फोरमने पाणी प्रश्न सोडवले. केळबारी हे १२ वे गाव ठरले आहे. गावापासून पाऊण किलोमीटरवर खोल जागेतील विहिरीवरून गावात पाणी उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे महिला आणि मुलांचे कष्ट वाचले आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांचे पावसाळ्यात अधिक हाल व्हायचे. हा प्रश्न सुटल्याने ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

याप्रसंगी फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, प्रशांत बच्छाव, रामदास शिंदे, सरपंच कमळाबाई दहावाड, उपसरपंच किसन दहावाड यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. डी. एम. पवार यांनी पेठ तालुक्यातील अतिदुर्गम केळबारी गावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवल्याचा आनंद होत असल्याचे नमूद केले. जलाभियानात जिव्हाळा कायम सोबत राहील, असे त्यांनी सांगितले.

अमेरिकेत वास्तव्यास असणारे किशोर गोरे यांनी वाडय़ा वस्त्यांना आजही किमान गरजांसाठी झगडावे लागते याची खंत व्यक्त करत अशा गरजवंतांसाठी सोशल फोरम १२ गावांचा पाणीप्रश्न सोडवू शकते हा सुखद अनुभव असल्याचे सांगितले.

सामूहिक प्रयत्नांचे यश

गावात पाणी उपलब्ध नव्हते. गावापासून पाऊण किलोमीटरवर खोल जागेत एक पाण्याचा स्रोत सापडला. परंतु या ठिकाणाहून पाणी वाहून आणणे हे जिकिरीचे काम होते. यावर उपाय म्हणून गावात टाकी बांधून तिथपर्यंत वाहिनीने पाणी आणण्यात आले आणि टाकीपासून गावातील प्रत्येक गल्लीत पाण्याचे नळ बसवण्यात आले. यासाठी जिव्हाळा ग्रुप या ज्येष्ठ नागरिक संस्थेने जलवाहिनी आणि वीज पंपासाठी आर्थिक योगदान दिले. ग्रामपंचायतीने शासकीय योजनेतून गावात टाकी बांधली. गावकऱ्यांनी या कामासाठी श्रमदान केले. फोरमच्या पथकाने प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कार्यवाही करून सर्वाच्या सहकार्यातून हे काम पूर्णत्वास नेले.