इगतपुरी : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत इगतपुरी तालुक्यात महिनाभरापासून पाळीव जनावरांना १२ अंकी आधार क्रमांक पशु विभागामार्फत देण्याचे काम सुरू आहे. केंद्र शासनाने पाळीव जनावरांनाही आधार क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तालुका पशुधन विकास अधिकारी पी. जी. कांगणे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद परिसरात महिनाभरापासून पशुधन विकास अधिकारी डॉ. जयश्री तळपाडे यांच्यासह पांडुरंग टोचे, लहानु साबळे, पवन भोईर यांचे पथक पाळीव प्राण्यांना लसीकरण आणि १२ अंकी आधार क्र मांकाचा बिल्ला  देण्याचे काम करत आहेत. आतापर्यंत टाकेद परिसरातील तीन हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून बिल्ले देण्यात आले आहेत.

गायी, बैल, म्हैस यांना स्वत:ची ओळख मिळवून देण्यासाठी बारा अंकी आधार क्रमांक देण्यात येत आहे. यामुळे जनावरांची माहिती एका कळनिशी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील गाय, बैल, म्हैस यांना लाळ खुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण तसेच जनावरांच्या कानाला बिल्ले मारण्याचे काम सुरू आहे. आधार कार्डवर त्याची नोंद एका विशेष प्रणालीवर केली जाणार आहे. जनावरांची परिपूर्ण माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.

पाळीव प्राण्यांच्या कानात बिल्ला नसल्यास यापुढे त्यांची खरेदी-विक्री करता येणार नसून नैसर्गिक आपत्तीत, विजेच्या धक्क्याने किंवा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जनावर दगावल्यास शासनाची भरपाई मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय कोणत्याही बँकेत जनावरांवर कर्ज घेतल्यास किं वा विमा रक्कम मिळण्यासाठी बिल्ला नंबर आवश्यक करण्यात आला आहे. यासाठी सर्व जनावरांची ऑनलाइन नोंदणी केली जाणार आहे.

इगतपुरी तालुक्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत लाळ, खुरकूत लसीकरणासोबतच जनावरांच्या कानाला बिल्ले मारण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद परिसरातील तीन हजार जनावरांना बिल्ले मारण्याचे काम पूर्ण झाले असून यासाठी आमचे पथक महिनाभरापासून कार्यरत आहे. यापुढे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना, जनावरांच्या आजारांबाबत या क्रमांकाची गरज भासणार असल्याने पशुपालकांनी आपल्याकडील सर्व जनावरांना बिल्ले मारून त्याची ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी.

– डॉ. जयश्री तळपाडे (पशुधन विकास अधिकारी, टाकेद श्रेणी)