12 December 2017

News Flash

फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकास अटक

न्यायालयाने फडणीसची २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

प्रतिनिधी, नाशिक | Updated: April 21, 2017 12:30 AM

 

फसवणूक प्रकरण

जादा व्याजदराचे आमिष दाखवत करवून घेतलेल्या गुंतवणुकीचे पैसे व्याजासह देण्यास टाळाटाळ करणाऱ्या फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरचा संचालक विनय फडणीसला अखेर नाशिक पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले.  न्यायालयाने फडणीसची २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

फडणीस ग्रुप ऑफ कंपनीज् आणि फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरने गुंतवणूकदारांना अधिक व्याजाचे आमिष दाखवत पैसे गुंतवण्यास भाग पाडले होते. या कंपनीविरोधात मागील महिन्यात काही तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कंपनीने हजार ते बाराशे वयोवृद्ध नागरिकांची कंपनीने फसवणूक केल्याची तक्रार गुंतवणूकदारांनी केली आहे. आयुष्याची जमापुंजी फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवली असल्याचा दावा त्यांनी केला. ही रक्कम अंदाजे दीडशे ते दोनशे कोटींच्या घरात आहे. मार्च २०१६ पासून कंपनीने परतावा देणे थांबविल्याची सामूहिक तक्रार करण्यात आली तर ४० गुंतवणूकदारांनी धनादेश वटले नाही अशी तक्रार केली. या सर्व तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.

कंपनी संचालकांना राजकीय पाठबळ असल्यामुळे पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला होता. गुंतवणूक परत मिळावी आणि संशयितांवर कारवाई व्हावी यासाठी गुंतवणुकदारांनी खासदार हेमंत गोडसे आणि मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घातल्यानंतर तातडीने कारवाई झाल्याची भावना गुंतवणूकदारांनी व्यक्त केली. दरम्यान, मुंबईच्या विक्रोळी परिसरातून संशयित विनय फडणीसला पोलिसांनी ताब्यात घेतले.

हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, उपायुक्त दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. गुरूवारी संशयित फडणीसला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

First Published on April 21, 2017 12:30 am

Web Title: phadnis infrastructure director is arrested in cheating case