शहरातील भारतनगर परिसरात मार्चमध्ये झालेल्या दंगलीनंतर फरार असलेल्या चार संशयितांना मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले असून यात नगरसेवक पुत्राचाही समावेश आहे. या चौघांना इगतपुरी शहर परिसरात अटक करण्यात आली. एका फरार नगरसेवक पुत्रास अटक झाली असताना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुहेरी खून प्रकरणातील फरार नगरसेवक पुत्र भूषण लोंढे हा पोलिसांना कधी सापडेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात भारतनगर परिसरात अतिक्रमणच्या नावाखाली तेथील रहिवाशांच्या झोपडय़ा स्थानिक गुंडांनी तोडल्या होत्या. त्यावरून संतप्त झोपडीधारक आणि गुंडांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. या प्रकरणात नगरसेवक पुत्र आकाश साबळे व फिलोमिना शर्मा यांच्यावर प्रामुख्याने नागरिकांचा रोष होता. झोपडपट्टी परिसरात इतर प्रांतातील मुलींना नोकरीचे आमिष दाखवून देहविक्रीचा व्यवसाय केला जात होता. दंगल प्रकरणानंतर मुलींची तेथून मुक्तताही करण्यात आली. मात्र या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार आकाश शर्मा, राजेश राठोड, संतोष खांदेकर आणि राहुल सोनजे हे फरार होते. राजकीय वरदहस्तामुळे हे प्रकरण दाबले जात असल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात येत होता. पोलीस आयुक्तांनी संशयितांचा शोध घेण्यासाठी राज्यात तसेच राज्याबाहेर विविध पथके पाठवली. मात्र संशयित पोलिसांना हुलकावणी देत होते. या कालावधीत संशयित मुंबई, पुणे, हैद्राबाद, तिरुपती, कोल्हापूर, गोवा, अजमेर या ठिकाणी मौजमजा करत फिरत राहिले. इगतपुरी येथील गायकवाडनगर परिसरात संशयित लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर नाशिक पोलिसांनी स्थानिक पोलिसांची मदत घेत सापळा रचून चारही संशयितांना अटक केली.
दरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुक्यात ३१ डिसेंबर रोजी झालेल्या दुहेरी खून प्रकरणातील संशयित नगरसेवक पुत्र भूषण लोंढे तीन महिने उलटूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. राजकीय दबावामुळे पोलीस जाणीवपूर्वक त्यास अटक करत नसल्याचा आरोप केला जात आहे.