नाशिक : शहर परिसरात वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे होणारे अपघात लक्षात घेऊन शहर पोलिसांकडून पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीसह बेशिस्त दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. १३ मेपासून शहर परिसरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याअंतर्गत ही मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

शहरात वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. एप्रिलपर्यंत रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये ६३ जणांचा मृत्यू झाला, ८८ गंभीर तसेच ३१ किरकोळ अपघातात १८३ जण जखमी झाले. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा अपघाताचे प्रमाण काही अंशी कमी असले तरी ते नियंत्रणात आणण्यासाठी शहर वाहतूक पोलीस आणि शहर पोलीस सक्रिय झाले आहेत.

अपघाताच्या कारणांचा विचार केला तर विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, विनासीटबेल्ट चारचाकी चालविणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे आदी कारणे समोर येत आहेत. दुचाकी अपघातात ३८ जणांचा मृत्यू झाला. त्यात ३५ चालकांनी हेल्मेट घातलेले नव्हते. चारचाकी चालकांचा अपघातात मृत्यू झाला. एकानेही सीटबेल्ट लावलेला नव्हता. चुकीच्या दिशेने गाडी नेल्याने अपघात झाले आहेत. याशिवाय अल्पवयीन वाहनचालक आणि त्यांच्या पालकांवरही मोठय़ा प्रमाणात कारवाई करण्याचे नियोजन आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर, १३ मेपासून शहरात हेल्मेट, सीटबेल्ट सक्तीसह वाहतूक नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

विनापरवाना वाहन चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, वाहन चालविताना भ्रमणध्वनीवर बोलणे, सिग्नलचे उल्लंघन करणे, एकेरी वाहतुकीच्या मार्गावर वाहन चालविणे, ट्रिपल सीट, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक तसेच क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करत असेल आणि नियमांचे उल्लंघन करत अपघाती मृत्यू झाला, तर वाहनचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याचा परवाना निलंबनाची कारवाई करणात येईल. याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी नमूद केले.