‘सावाना’तर्फे सन्मान

माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी देश महासत्ता होईल हे दाखविलेले स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी देशातील तरुणाई पुढाकार घेत आहे. अवकाश संशोधनात भारताचा ठसा उमटावा या दृष्टीने पावले पडण्यास सुरुवात झाली आहे. सिन्नर येथील देवयानी गुजर हिला ऑस्ट्रेलियातील नॅशनल स्पेस सोसायटीच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत मंगळयान मोहिमेसंदर्भात प्रबंध सादर करण्याची संधी मिळाली आहे. यानिमित्ताने येथील सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या वतीने शुक्रवारी तिचा सत्कार करण्यात आला.

सिन्नर येथील लोकनेते वाजे विद्यालयातून माध्यमिक, तर सिन्नर महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेपर्यंत देवयानीने शिक्षण घेतले. अवकाश संशोधनाचा अभ्यास करण्यासाठी तिने चेन्नई येथील ‘आयआयटी’ची निवड केली. या ठिकाणी अवकाश संशोधनात विज्ञान आणि यान या दोघांचा अभ्यास सुरू केला. एका स्पर्धेत सहभागी होतांना अवकाश संशोधनासंदर्भात विविध विषय समोर आले. त्यात देवयानीने मंगळ मोहिमेची स्पर्धेसाठी निवड केली.

स्पर्धेनंतर परिषदेत सहभागी होण्यासाठी तिने या विषयाचा सखोल अभ्यास केला. या प्रबंधाची नॅशनल स्पेस सोसायटी ऑफ ऑस्ट्रेलियाने दखल घेतली. परिषदेसाठी नॅशनल कमिटी फॉर स्पेस अ‍ॅण्ड रेडिओ सायन्स, मार्स सोसायटी ऑफ ऑस्ट्रेलिया यांचे सहकार्य लाभले. गोल्ड कोस्ट येथे ऑस्ट्रेलियन अंतराळ संशोधन परिषद २४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत होणार असून या परिषदेत ती मंगळयान मोहिमेतील संशोधनाबाबत प्रबंध सादर करणार आहे.  सध्या भारत मंगलयान मोहीम-२ साठी प्रयत्नशील आहे. मोहिमेत येणाऱ्या अडचणींचा अभ्यास केला असता, यानाच्या अवकाशात जाण्यापर्यंतच्या आणि परत येण्याच्या प्रवासात इंधनसह अन्य खर्च वाढतो, असे देवयानीने सांगितले. या पार्श्वभूमीवर इंधनाचा खर्च वाचविण्यासाठी अवकाशातीलच काही घटकांचा वापर करत अवकाशात जाणाऱ्या उपग्रहासाठी लागणारे इंधन, पाणी अवकाशातच तयार करण्यात येऊ शकते. यासाठी तेथील काही घटकांचा वापर केला जाणार असून या संशोधनामुळे इंधनाचीही बचत होणार आहे. यामुळे अवकाशात इंधनामुळे होणारे प्रदूषण थांबेल तसेच मोहिमेसाठी येणाऱ्या खर्चात बचत होईल, असा दावा देवयानीने केला आहे. भारतातून केवळ दोन  जणांची ऑस्ट्रेलियातील परिषदेसाठी निवड झाली आहे. यासाठी तिला चेन्नई येथील ‘आयआयटी’चे प्रकल्प समन्वयक विक्रम रामानन यांचे मार्गदर्शन लाभले.