पोषणआहार देयकाचा धनादेश मंजूर झाल्याच्या बदल्यात तीन हजाराची लाच स्वीकारताना इगतपुरीच्या पिंपळमोर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत दाजी गांगुर्डेला बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

तक्रारदार या जिजामाता महिला बचत गटाच्या अध्यक्षा आहेत. या बचत गटास ग्रामपंचायतीने ठराव करून शाळेतील मुलांना पोषण आहार पुरविण्याचे काम दिले होते. त्यानुसार हा बचत गट विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवीत आहे. त्यांनी पुरविलेल्या पोषण आहाराचे दहा हजार रुपये देयक झाले होते. हे देयक मंजूर होऊन धनादेशही प्राप्त झाला. देयकाचा धनादेश मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक गांगुर्डेने तीन हजार रुपयांची मागणी केली होती. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. त्यानुसार या विभागाने सापळा रचला. दुपारी एक वाजता ही रक्कम स्वीकारत असताना पथकाने गांगुर्डेला पकडले. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.