भुसे-हिरे गटातील सत्तासंघर्ष

मालेगाव : राजकीयदृष्ट्या अत्यंत जागृत असलेल्या दाभाडीत लोकनियुक्त सरपंच चारुशीला निकम यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेल्या अविश्वास ठरावास ग्रामसभेनेदेखील मंजुरी दिली. ग्रामसभेच्या या कौलामुळे निकम यांना सरपंचपदावरून पायउतार व्हावे लागले असून यानिमित्ताने कृषिमंत्री दादा भुसे आणि युवा नेते अद्वय हिरे या दोन गटांमध्ये झालेल्या सत्ता संघर्षात भुसे गटाची सरशी झाल्याचे अधोरेखित झाले आहे.

२०१७ मध्ये झालेल्या दाभाडी ग्रामपंचायत निवडणुकीत भुसे-हिरे यांच्या गटामध्ये जोरदार लढत झाली होती. थेट निवडणुकीतून सरपंचपद चारुशीला निकम यांच्या रूपाने हिरे गटाने हस्तगत केले होते. तर ग्रामपंचायत सदस्यांच्या १७ जागांपैकी १० जागा भुसे गटाने आणि सात  जागा हिरे गटाने प्राप्त केल्या  होत्या. वर्षभरानंतर सत्ताधारी हिरे  गटात बेबनाव निर्माण झाल्याने या गटातील चार सदस्य विरोधकांना मिळाले.

या सत्ता संघर्षाचा परिपाक म्हणून गेल्या महिन्यात १४ सदस्यांनी सरपंच निकम यांच्यावर अविश्वास आणला. १४ विरुद्ध दोन अशा संख्याबळावर हा ठराव मंजूर झाल्यावर लोकनियुक्त सरपंचावरील अविश्वास ठराव नियमानुसार ग्रामसभेच्या मान्यतेसाठीची मतदान प्रक्रिया घेण्यात आली. तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली आणि गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या प्रक्रियेसाठी एकूण पाच हजार ३९७ मतदारांनी नोंदणी केली. त्यानंतर विहित वेळेत घेतलेल्या एक हजार २७२ मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे पीठासन अधिकारी राजपूत यांनी जाहीर करताच भुसे समर्थकांनी जल्लोष केला.

दरम्यान, दाभाडी गावाशेजारीच असलेल्या पाटणे ग्रामपंचायतीत अशाच प्रकारे हिरे-भुसे गटात सत्तासंघर्ष उफाळून आला आहे. ग्रामपंचायतीच्या १२ सदस्यांनी तेथील लोकनियुक्त सरपंच राहुलाबाई अहिरे यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव ग्रामसभेने अलीकडेच फेटाळला होता. त्यामुळे तेथील सरपंचपद टिकविण्यात हिरे गटाला यश आले. या पार्श्वभूमीवर, दाभाडीच्या सरपंचावरील अविश्वासाबद्दल निर्माण झालेल्या चुरशीच्या वातावरणामुळे ग्रामसभा काय निकाल देते, याकडे सर्वांचे लक्ष होते.

मतदानात पाच हजार

६५  मतदारांनी हक्क बजावला. यात ठरावाच्या बाजूने तीन हजार ४९  तर ठरावाच्या विरोधात एक हजार ७७७ मतदारांनी कौल नोंदवला. २३९ मते अवैध ठरली.