महिनाभराच्या विश्रांतीनंतर रविवारी शहरासह जिल्ह्य़ातील काही भागास वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. उकाडय़ाने हैराण झालेल्या नाशिककरांना अचानक आलेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला.
सकाळपासूनच जिल्ह्य़ात ढगाळ वातावरण होते. दुपारी थोडा वेळ ऊन पडल्याने पाऊस येण्याची शक्यता दुरावली होती; परंतु चार वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसास सुरुवात झाली. सुटीचा दिवस पाहून बाहेर पडलेल्या नाशिककरांची अचानक आलेल्या पावसामुळे त्रेधातिरपीट उडाली. विजांच्या प्रचंड कडकडाटामुळे वातावरण पूर्णपणे पावसाळी झाल्यासारखे वाटत होते. पाथर्डी फाटय़ावरील वासननगरमध्ये रोहित्राजवळ वीज पडल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी नमूद केले. वादळी वाऱ्यामुळे शहरातील विविध भागांत सात ते आठ ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. महात्मा गांधी रस्त्यासह शहराच्या काही भागांत सुमारे तासभर वीजपुरवठा खंडित होता. शहरात सुमारे दीड तास पाऊस सुरू राहिला. जिल्ह्य़ात निफाड, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी, देवळा या भागांतही पावसाने हजेरी लावली असली तरी नाशिक शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या गंगापूर धरणक्षेत्रात, म्हणजेच त्र्यंबकेश्वर येथे रात्री उशिरापर्यंत पाऊस नव्हता.