हवाईदलातील शिक्षिकेची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार

नाशिक : रेल्वे प्रवास आरक्षणात ऑनलाइन नोंदणी पद्धतीने पारदर्शकता आल्याचा दावा होत असला तरी प्रवाशांना तिकीट काढून देणाऱ्या दलालांची लूटमार सुरूच असल्याचा प्रकार उघड झाला आहे. दिल्लीहून नाशिकरोडला येण्यासाठी चार हजार ६०५ रुपयांच्या तिकिटासाठी दलालाने हवाई दलातील केंद्रातील शिक्षिकेकडून नऊ हजार रुपये उकळले असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात संबंधित शिक्षिकेने रेल्वे सुरक्षा बल पोलिसांसह रेल्वे मंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

देवळालीच्या हवाई दल केंद्रात शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या रचना बाली यांनी या संदर्भात नाशिकरोड रेल्वे सुरक्षा बल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकलगतच्या साई ट्रॅव्हल्सकडून तीन जणांसाठी ई तिकीट नोंदणी केली. हजरत निजामुद्दीन ते नाशिकरोड रेल्वे प्रवासाचे तिकीट काढताना कंपनीच्या दलालाने पहिल्यांदा प्रतीक्षा यादीवरील तिकीट मिळेल आणि प्रवासाआधी आरक्षित जागा मिळेल, त्यासाठी नऊ हजार रुपये द्यावे लागतील, असे संबंधिताने सांगितले.

त्याच्या म्हणण्यानुसार आपण नऊ हजार रुपये रोख स्वरूपात दिले. तिकिटाची प्रत काढली तेव्हा डबा आणि आसन क्रमांकाची जागा रिक्त होती. दुसऱ्या दिवशी दलालाने त्याच तिकीट प्रतीवर डबा क्रमांक, आसन क्रमांक पेनने लिहून दिले. या प्रवासात बाली यांची सामाजिक कार्यकर्ते रवींद्र अमृतकर यांच्याशी भेट झाली.

त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली ते नाशिकरोडच्या प्रवासासाठी सर्वाचे मिळून एकूण ४६०५ रुपये भाडे तिकीट लागते. परंतु, दलालाने पाच हजार ६०५ रुपये जास्त घेतले. ही बाब लक्षात आल्यावर बाली यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात लेखी स्वरुपात तक्रार दिली. तसेच रेल्वेमंत्र्यांकडे लघुसंदेशद्वारे तक्रार केली आहे. तिकिटासाठी लुबाडली गेलेली अधिकची रक्कम परत मिळावी, अशी मागणी बाली यांनी केली आहे.