शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी

इगतपुरी : तालुक्यात महिन्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे भातशेती संकटात सापडली आहे. पंधरवडय़ापासून पुराचे पाणी शेतांमध्ये राहिल्याने भातरोपांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तालुक्यात अद्यापही हजारो हेक्टरवरील भाताची रोपे पाण्याखाली असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

भात लागवडीवरील खर्च, बियाणे,खतांवर झालेला खर्च, मजुरीसाठी लागलेले पैसे पाण्यात गेल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. तालुक्यात खम्रीपाचे प्रमुख पीक म्हणजे भात पीक होय. जूनच्या प्रारंभापासूनच तालुक्यातील शेतकरी भाताची पेरणी, लागवडीच्या कामाला लागतात. त्यात यावर्षी उशीरा पाऊस सुरु झाल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. कर्ज, उसनवार पैसे घेऊन बियाणे, खतांची खरेदी करावी लागली. आवणीसाठी (भात लागवड) झालेल्या खर्चामुळे शेतकरी आधीच कर्जबाजारी झाला असतांना आता भातपिकावर जलसंकट आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. संपूर्ण तालुक्यातील शेती पुराच्या पाण्याखाली आहे. काही शेतातील रोपे पुराच्या पाण्यात वाहुन गेले.काही ठिकाणी शेतात पाणी असल्याने रोपे सडण्याच्या मार्गावर आहेत. या जलसंकटमुळे झालेल्या खर्चावर पाणी फिरते की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

दरम्यान, आमदार निर्मला गावित यांनी इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे महसूल यंत्रणेने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई त्वरीत देण्याची मागणी केली आहे. भात, नागली, वरई आदी पिके वाहून गेली आहेत.

शेकडो घरांमध्ये पाणी शिरून त्यांचे नुकसान झाले आहे. अन्नधान्य आणि उपयुक्त वस्तूंचे नुकसान झाले आहे. इगतपुरी तालुक्यात वाहून गेलेल्या रस्त्यांमुळे दळणवळण कोलमडले आहे. विजेचे खांब उन्मळून पडून तारांचे नुकसान झाले आहे. सर्वच शेतकऱ्यांचे भातासह इतर पिके वाहून गेली असल्याचे गावित यांनी म्हटले आहे. आमदारांनी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्याचा भर पावसात दौरा करून नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आमदारांकडे व्यथा मांडली. याबाबत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना त्यांनी पत्र पाठवून भरपाईची मागणी केली.