देखरेखीसाठी सात विशेष पथके

नाशिक : ‘करोना’विषयी वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यात येत असले तरी नागरिकांमध्ये आजाराविषयी भीती कायम आहे. या भीतीचा फायदा घेत काही औषध विक्रेत्यांनी सॅनिटायझर, मास्कची विक्री किंमत वाढवून करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर, आरोग्य विभाग सात विशेष पथकांच्या माध्यमातून औषध विक्रेत्यांवर लक्ष ठेवणार असून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक रुग्णालय, औषध विक्री दुकानात ‘प्रबोधनात्मक फलक’ लावण्यात येणार आहेत.

करोना अधिक फैलावू नये यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असून विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची तसेच विदेशातून येणाऱ्या स्थानिकांची माहिती संकलित करण्यास आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे. आतापर्यंत विशेषत करोनाग्रस्त देशातून नाशिकमध्ये आलेल्या २७ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यातील सात रुग्णांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवला. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात संबंधितांवर उपचार आणि आवश्यक तपासण्या केल्या जात आहेत. पाच रुग्णांचा अहवाल नकारात्मक आला असून अद्याप दोन रुग्णांचा अहवाल आलेला नाही.

करोनाच्या भीतीमुळे सामान्य नागरिकांकडूनही मास्क, सॅनिटायझरची मागणी केली जात आहे. या संधीचा फायदा घेत औषध विक्रेत्यांनी मास्क तसेच सॅनिटाझरच्या किमती वाढवून विक्रीस सुरुवात केल्याच्या तक्रारी वाढत असतांना अन्न आणि औषध प्रशासन विभाग मात्र अशा तक्रारी आल्याच नसल्याचा दावा करत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी बुधवारी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे पदाधिकारी तसेच औषध विक्रेता संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची        बैठक महापालिकेत बोलावली. या बैठकीत मास्क आणि सॅनिटायझरच्या वाढलेल्या किमतीकडे लक्ष वेधण्यात आले. असे प्रकार होऊ नयेत, संशयितांना चाप बसावा यासाठी सात विशेष पथके जिल्ह्य़ातील प्रत्येक औषध विक्रेत्यांच्या दुकानांवर बनावट गिऱ्हाईक पाठवून मास्क, सॅनिटायझरच्या किंमतीची माहिती जमा करणार आहे. या संदर्भातील माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांना अहवाल सादर केला जाईल. किमती जास्त आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.  याविषयी डॉ. जगदाळे यांनी करोनामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे सांगितले आहे. ज्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास होत आहे. त्यांनी केवळ मास्क किंवा तोंडाला स्वच्छ धुतलेला रुमाल बांधावा. तसेच सॅनिटायझर हे प्रत्येकासाठी गरजेचे आहे असेही नाही. ही माहिती देणारे फलक आता रुग्णालय, औषधांच्या दुकानात लावण्यात येणार आहे. तसेच हा विषाणूजन्य आजार असल्याने नागरिकांनी संयम बाळगावा. विदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती प्रशासनाला कळवावी असे आवाहन त्यांनी केले.

दिव्याखाली अंधार

‘करोना’चा वाढता प्रादुर्भाव पाहता सार्वजनिक कार्यक्रमांवर प्रशासनाने काही निर्बंध लादले आहेत. या र्निबधांना नाशिक महापालिकेनेच हरताळ फासला. बुधवारी महिला दिनाचे औचित्य साधत महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने गुणगौरव सोहळा झाला. कालिदास कलामंदिर तुडुंब भरले. तर दुसरीकडे सायंकाळच्या सत्रात नाशिक स्त्रीरोग तज्ञ संघटनेच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधत ‘तू नारायणी’ हा महिलांच्या आरोग्यविषयक प्रबोधन करणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र शासनाने लोकांना एकत्रित येण्यावर निर्बंध घातले असल्याने संघटनेने हा कार्यक्रम रद्द केला.

जमावबंदी आदेश ‘करोना’मुळे नाही

दोन ते तीन दिवसांपासून नागरिकांमध्ये आणि प्रसार माध्यमांमध्ये नाशिक शहरात करोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू झाला असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. वास्तविक हा आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वये रंगपंचमी आणि धुलीवंदन या पार्श्वभूमीवर रंग तसेच रासायनिक द्रव्यांनी भरलेले फुगे मारू नये अथवा बाळगू नये यासाठी काढलेला आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम अन्वये उपायुक्त, गुन्हे, विशेष शाखा यांच्यामार्फत काढण्यात आलेला प्रतिबंधक आदेश हा कायदा सुव्यवस्थेसंदर्भात निर्गमित केला जातो. दोन्ही आदेशांमध्ये कुठेही ‘करोना’ विषयक उल्लेख नाही. नागरिकांनी गैरसमज करून घेऊ नये. कुठल्याही अफवेला बळी पडू नये.

-लक्ष्मीकांत पाटील  (पोलीस उपायुक्त)