नाशिक : लोकसभा निवडणुकीत सोमवारी मतदान प्रक्रिया आटोपल्यावर इव्हीएम यंत्र बंदिस्त करत असतांना इव्हीएम यंत्राचे छायाचित्र काढू देण्यास पोलिसांनी नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या येवला तालुक्यातील पुरणगावच्या सरपंचाने नातेवाईकांच्या मदतीने पोलीस अधिकारी आणि क र्मचाऱ्यांना मारहाण केली. या प्रकारानंतर सरपंचासह पाचही संशयित फरार आहेत.

येवला तालुका हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येतो. पुरणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र क्रमांक २४३ येथे सोमवारी मतदान आटोपल्यावर मतदान केंद्रातील कर्मचारी हे त्यांच्या ताब्यातील इव्हीएम यंत्र सीलबंद करत असतांना रात्री सरपंच भाऊसाहेब ठोंबरे आला.

दारूच्या नशेत कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत मतदान केंद्राध्यक्षांना आपणास इव्हीएम यंत्राचे छायाचित्र काढावयाचे असल्याचे सांगत त्यांच्याशी वाद घालु लागला. त्यावेळी अन्य कर्मचाऱ्यांनी ठोंबरे यास समजाविण्याचा प्रयत्न केला असता त्याने आरडाओरड करत बाहेर असलेल्या त्याच्या नातेवाईकांला बोलावून घेतले.

बाहेर असणारे अन्य चार संशयित मतदान केंद्रात दगड, विटा घेवून आले. त्यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मारहाण केली. शिवीगाळ करत तुम्हाला पाहून घेऊ, असा दम देत निघून जाण्याचा इशारा दिला. हा सर्व प्रकार नियंत्रण कक्षाला कळविण्या आल्यावर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल होताच संशयित फरार झाले.