आंतरमहाविद्यालयीन असो वा राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा असो.. नवोदितांना व्यक्त होण्यासाठी अशा स्पर्धा हक्काचे व्यासपीठ ठरतात. बऱ्याचदा स्पर्धेत सहभागी होतांना संहिता नवी हवी किंवा त्या संदर्भात आयोजकांकडून अटी घातल्या जातात. यामुळे नवोदितांना कामात अडचणी येतात. दुसरीकडे, वेगवेगळ्या स्पर्धेतून आयोजकांकडे येणाऱ्या संहितेची गणतीच नसते. ही संमिश्र परिस्थिती लक्षात घेत अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद नाशिक शाखेने हाती घेतलेल्या ‘संहिता पेढी’ (स्क्रीप्ट बॅंक) अनोखा उपक्रम रंगकर्मीना महत्त्वाचा आधार ठरला आहे. या उपक्रमाचा आजवर २०० हून अधिक रंगकर्मीना लाभ घेतला, हे विशेष.

दिवाळीच्या सुटीनंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेध लागतात ते वेगवेगळ्या युवा महोत्सवाचे. या महोत्सवात कला प्रांतातील विविध पध्दतीने मुशाफिरी ठरलेली असतांना अनेकांना व्यक्त होण्यासाठी नाटक हे योग्य माध्यम वाटते. लेखनापासून रंगभूषा, नेपथ्य, अभिनय या वेगवेगळ्या कलांविषयी आवड असणाऱ्यांची मांदियाळी या ठिकाणी जमते. या कला मांदियाळीला नेटाने पुढे नेणारा दिग्दर्शक मात्र संहितेच्या शोधात अडकतो. बऱ्याचदा आयोजकांकडून नवी संहिता किंवा लेखकाच्या परवानगीने अशा काही अटी दिल्या जातात. दिग्दर्शकाला एखादे नाटक आवडले तर लेखकाचा शोध घेण्यापासून सुरूवात किंवा नवी संहिता कुठून आणायची, लेखकाची परवानगी अशी अडथळ्यांची र्शयत पार करत नाटक आकारास येते. प्रायोगिक रंगभूमीवर, काम करणाऱ्या कलावंताना हे फारसे अवघड जात नाही. मात्र नवोदितांना ही तीन पायांची र्शयत पार करतांना अडचणी येतात. या पाश्र्वभूमीवर, दोन वर्षांपूर्वी येथील अखिल भारतीय नाटय़ परिषदेने ‘संहिता पेढी’ हा उपक्रम हाती घेतला. युवा दिग्दर्शक प्रवीण कांबळे व परिषदेचे अन्य पदाधिकारी यांच्या सहकार्याने राज्य नाटय़ स्पर्धा, कामगार कल्याण मंडळाच्या स्पर्धा, वेगवेगळ्या आयोजकांकडून तसेच खासगी नाटय़ संस्थांकडून घेण्यात येणाऱ्या नाटय़ स्पर्धा यामध्ये जमा झालेल्या संहितेच्या मूळ प्रती त्यांनी जमा करण्यास सुरुवात केली.

याशिवाय नाटय़ परिषदेचे पदाधिकारी ज्या ठिकाणी परीक्षक म्हणून जातील त्यांनी तिथून संहितेच्या प्रती आणायचा या प्रयत्नातून आज नाशिक शाखेकडे एक हजाराहून अधिक संहिता जमा झाल्या असल्याची माहिती कार्यवाह सुनील ढगे यांनी दिली. या मध्ये कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांसारख्या नाटय़ क्षेत्रातील दिग्गजांसह अन्य नावाजलेल्या लेखकांच्या नाटय़ संहितांचा अंतर्भाव आहे. या संहितांचे योग्य पध्दतीने जतन व्हावे, याची काळजी घेतली जाते. त्यांना खास लोखंडी कपाटात ठेवण्यात आले आहे. कार्यालयीन वेळेत रंगकर्मीना त्या संहितेचे वाचन करता येते. ज्यांना त्या वाचनासाठी घरी हव्या किंवा कामासाठी हव्यात त्याची नोंद करून त्यांना त्या छायांकित प्रतीसाठी देण्यात येतात. संहितेसोबत लेखकाची माहिती असल्याचे दिग्दर्शकासह अन्य व्यक्तींना यातून लाभ होता. आतापर्यंत वेगवेगळ्या स्पर्धासाठी २०० हून अधिक रंगकर्मीनी याचा लाभ घेतला आहे.

राज्यात केवळ नाशिक नाटय़ परिषद शाखेच्यावतीने ‘संहिता पेढी’ हा उपक्रम सुरू असून तो रंगकर्मीसाठी खुला आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आयोजकांनी आपल्याकडे जमा झालेल्या संहिता नाटय़ परिषदेकडे जमा कराव्यात.

प्रा. रवींद्र कदम

(अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, नाशिक शाखा)