नाशिक : जिल्ह्यात करोना रुग्ण संख्येने दोन लाख, सात हजार ६६४ चा टप्पा ओलांडला आहे. करोना रुग्णांमध्ये पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक असून युवा तसेच ४१ वर्षापुढील पुरूषांचा त्यात अधिक समावेश आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या दोन हजार ५२९ झाली असून त्यात ज्येष्ठांचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती जिल्हा समन्वयक अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतांना प्रशासनाने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी काही प्रमाणावर निर्बंधांची मोहीम हाती घेतली आहे. या आजाराचा संसर्ग नवजात शिशुपासून सर्वांनाच झाला आहे. शून्य ते १२ या वयोगटात नऊ हजार ९१८, तसेच १३-२५ वयोगटात ३० हजार २१३,  २६ ते ४० मध्ये ६८,७२९ आणि ४१-६० मध्ये सर्वाधिक म्हणजे ६८,८६६ व्यक्तींना करोनाचा संसर्ग झाला.  ६१ वर्षांपुढील वयोगटात हे प्रमाण तुलनेत कमी २९,९३८ इतके  आहे.

जिल्ह्यात करोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये शून्य ते १२ वयोगटात दोन, १३ ते २५ वयोगटात २२, तसेच २६ ते ४० वयोगटात १८०, तर ४१ ते ६० वयोगटात ८८४ जणांचा समावेश आहे. ६१ वर्षापुढील रुग्णांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक म्हणजे एक हजार ४४१ इतके  आहे. जिल्ह्यात करोनामुळे दगावलेल्यांची संख्या दोन

हजार ५२९ वर पोहचली आहे. ज्येष्ठांचे प्रमाण करोना रुग्णांमध्ये अधिक आहे. मुखपट्टीचा वापर, हात वारंवार धुणे, सामाजिक अंतर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. बाहेर गेलेल्या लोकांनी घरी परतल्यावर स्नान करावे, कपडे बदलून टाकावे, करोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. पवार यांनी के ले.