News Flash

राज्य परिवहनच्या ‘सावित्रीबाई जोतिबा फुले शिष्यवृत्ती’ला अल्प प्रतिसाद

राज्य परिवहन महामंडळात लाखाहून अधिक कामगार, कर्मचारी, अधिकारी काम करीत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

चारूशीला कुलकर्णी

हजारो कर्मचारी पालक उदासीनतेमुळे लाभापासून वंचित

राज्य परिवहनच्या वतीने तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक  खर्चास हातभार लावण्यासाठी ‘सावित्रीबाई जोतिबा फुले शिष्यवृत्ती’ योजना सुरू करण्यात आली आहे. याविषयी वेगवेगळ्या मेळाव्याच्या माध्यमातून माहिती दिली गेली असली तरी या योजनेसंदर्भात मोजकेच अर्ज प्राप्त झाले आहेत. यामुळे नव्या शैक्षणिक वर्षांत या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त अर्ज प्राप्त करण्यासाठी मंडळ प्रयत्नशील आहे.

राज्य परिवहन महामंडळात लाखाहून अधिक कामगार, कर्मचारी, अधिकारी काम करीत आहेत. तृतीय तसेच चतुर्थ श्रेणी कामगारांचा आर्थिक स्तर लक्षात घेता त्यांना विविध आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्याचा अप्रत्यक्ष फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला बसतो. या पाश्र्वभूमीवर महामंडळाने ऑक्टोबर २०१७ मध्ये ‘सावित्रीबाई जोतिबा फुले शिष्यवृत्ती’ योजना आणली. या अंतर्गत संबंधित कर्मचाऱ्याच्या मुलांना १२ वीनंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाशी संलग्न पदवी, पदविका शिक्षण घ्यायचे असेल तर महिन्याला विद्यार्थ्यांच्या खात्यावर ७५० रुपये जमा होणार आहेत. या योजनेचा लाभ केवळ दोन पाल्यांसाठी घेता येईल. पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याने त्याचा गैरवापर होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक विभागाचा विचार केल्यास सहा हजाराहून अधिक कर्मचारी या योजनेसाठी पात्र ठरत असतांना केवळ २०० अर्ज या संदर्भात महामंडळाच्या नाशिक विभागाला प्राप्त झाले असल्याची माहिती विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी दिली.

शिक्षणासाठी होणारा खर्च पाहता महामंडळाच्या सहकारी बँकेच्या वतीने विना व्याज शैक्षणिक कर्जासाठी ‘कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रीम’ योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत कला, वाणिज्य, विज्ञान, संगणकीय विज्ञान पदवी शिक्षणासाठी १२ वीनंतर प्रति पाल्य ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. तर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी दोन लाखापर्यंतचे कर्ज हे कर्मचाऱ्याला घेता येते. यासाठी काही अटी-शर्थी ठेवण्यात आल्या आहेत. या योजने अंतर्गत केवळ २० अर्ज आतापर्यंत प्राप्त झाले आहेत.

या पाश्र्वभूमीवर, आगामी शैक्षणिक वर्षांचा विचार करता विविध कामगार संघटना, आगार, विभागीय कार्यालय, प्रशिक्षण केंद्र आदी ठिकाणी मेळाव्याच्या माध्यमातून या विषयी ही माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कामगार संघटनांच्या नेत्यांसोबत चर्चा करत त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यात येत असल्याचे मैंद यांनी सांगितले.

केवळ २२० लाभार्थी नाशिक विभागातील

१३ आगार, विभागीय कार्यालय, टायर नूतनीकरण संयत्र या ठिकाणी पाच हजाराहून अधिक तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कामगार आहेत. सावित्रीबाई जोतिबा फुले शिष्यवृत्ती योजना आणि कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रीम योजनेचा लाभार्थी होण्यासाठी इच्छुक कर्मचाऱ्यांनी पाल्याचे १२ वी उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक, कुठल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला त्याची पावती, लिखित स्वरूपातील अर्ज, विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा तपशील देणे गरजेचे आहे. दरम्यान, नाशिक विभागातून पाच हजाराहून अधिक लाभार्थी असताना दोन्ही योजना मिळून केवळ २२० कर्मचारी योजनेचा लाभ घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2019 2:58 am

Web Title: short response to savitribai jyotiba phule scholarship of state transport
Next Stories
1 स्थायी समितीवर नव्याने सात सदस्यांची निवड
2 नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात १५ हजारांहून अधिक पक्षी
3 ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेची आज विभागीय अंतिम फेरी
Just Now!
X