माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ शहरात मूक मोर्चाचे नियोजन करताना संयोजकांनी मराठा क्रांती मूक मोर्चाच्या धर्तीवरच तयारी केल्याचे पहावयास मिळत आहे. जिल्ह्यासह देशातून समर्थकांना बोलावत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा संयोजकांचा प्रयत्न आहे. त्यासाठी महिनाभरापासून जय्यत तयारी केली गेली. मोर्चाला पाठिंबा देत त्यात सहभागी होण्याचे जाहीर करणाऱ्या संघटनांची संख्याही विस्तारत आहे. तथापि, दुसरीकडे मोर्चाची घटिका जशी समीप येत आहे, तसे मोर्चात सहभागी व्हावे की नाही, या द्विधा मनस्थितीत अनेक जण सापडल्याचे दिसत आहे.

वेगवेगळ्या प्रकरणात छगन भुजबळ यांच्यासह भुजबळ कुटुंबीयांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या अंतर्गत छगन भुजबळ यांच्यासह माजी खासदार समीर भुजबळ हे कारागृहात आहेत. भुजबळ परिवाराकडून चौकशीला संपूर्ण सहकार्य केले जात असतांना चौकशीच्या नावाखाली बोलावत त्यांना कोठडीत ठेवले गेले. राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी त्यांची प्रतिमा अधिकाधिक मलिन केली जात असल्याचा आरोप भुजबळ समर्थकांचा आहे. त्यामुळे समर्थकांमध्ये निर्माण झालेला असंतोष मूक मोर्चातून प्रगट करण्यात येणार आहे. हा मोर्चा कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही. भुजबळांवरील अन्यायाविरोधात समर्थक रस्त्यावर उतरत आहेत. या मोर्चाला विविध जातींशी निगडित तसेच पक्षीय संघटनांनी पाठिंबा देऊन सहभागी होण्याचे मान्य केले आहे. मोर्चाचे नेतृत्व विद्यार्थिनी, युवती, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अन्य नागरिक आणि शेवटी बहुजन समाजातील पदाधिकारी राहणार आहेत. मोर्चा मार्गावर स्वच्छतेसाठी स्वयंसेवकांचे पथकही कार्यान्वित राहील. वेगवेगळ्या भागातून येणारी वाहने उभी करण्यासाठी स्वतंत्र वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य व्यवस्था, ध्वनिक्षेपकाद्वारे गर्दीचे नियंत्रण, नियंत्रण कक्ष आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चाचे संपूर्ण नियोजन काही दिवसांपूर्वी झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या धर्तीवर झाल्याचे दिसून येते. विविध संघटनांनी मोर्चात सहभाग घेण्याची तयारी दर्शविली असली तरी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात आहेत. न्यायप्रविष्ट प्रकरणात न्यायालयीन पातळीवर लढणे महत्वाचे ठरते. मोर्चा काढून दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे काहींना वाटते तर त्यातून नेमके काय साध्य होईल, असाही अनेकांना पडलेला प्रश्न आहे. मोर्चा केवळ ओबीसींपुरताच मर्यादित राहू नये, असा समर्थकांचा प्रयत्न आहे. त्यासाठी विविध समाज घटकांशी, त्यांच्या संघटनांशी बैठकीद्वारे चर्चा केली जात आहे. भुजबळांशी ऋणानुबंध जपणाऱ्या अनेकांनी पाठिंबा दिला असला तरी काही जण मात्र संभ्रमात आहेत.

मोर्चा मार्ग

तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिर येथून मोर्चाला सुरुवात होईल. चव्हाण मळा, आठवण लॉन्समार्गे तपोवन कॉर्नर, काटय़ा मारुती मंदीर, जुना आडगाव नाका, निमाणी बस स्थानक, पंचवटी कारंजा, मालेगाव बस स्थानक, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, एम.जी. रोड, मेहेर सिग्नल, जिल्हाधिकारी कार्यालय असा मार्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे निवेदन वाचन केल्यानंतर मोर्चाचा समारोप राष्ट्रगीताने होणार आहे.