केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समाविष्ट झालेल्या नाशिकला स्मार्ट करण्यासाठी नेमक्या कोणत्या संकल्पना मांडण्यात आल्या आहेत, त्याचे सादरीकरण शुक्रवारी दुपारी तीन वाजता करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरवासीयांचे मत जाणून घेतली गेले होते. त्या नंतर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यात आला. या अहवालात सर्वसामान्यांच्या संकल्पनांना कितपत स्थान मिळाले याची उकल या निमित्ताने होईल.

केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत नाशिकचा समावेश झाल्यानंतर या विषयावर आजवर बरेच चर्चितचर्वण झाले आहे. केंद्रामार्फत याआधी राबविण्यात आलेल्या अनेक योजनांची पालिकेने केलेली अंमलबजावणी फारशी चांगली नाही. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूत्थान योजना हे त्याचे ठळक उदाहरण. ज्या उत्साहाने केंद्राच्या योजनांमध्ये महापालिका सहभाग नोंदविते, त्या उत्साहात पुढील काळात कामे मात्र होत नाही. वेगवेगळ्या कारणांनी योजना रखडल्या जातात. या स्थितीत स्मार्ट सिटीच्या योजनेत समावेश झाल्यानंतर नेमके काय होणार, असाही प्रश्न करदात्यांना पडला आहे. स्मार्ट सिटीसाठी शहरात कोणकोणते बदल घडविणे आवश्यक आहे, कोणत्या नव्या योजना राबविल्या जातील याबाबत शहरवासीयांची मते जाणून घेतली गेली होती. उद्योजक, व्यापारी, वास्तु रचनाकार आदी क्षेत्रातील नागरिकांनी आपापल्या संकल्पना पालिकेसमोर मांडल्या होत्या. यासह वेगवेगळ्या तज्ज्ञ संस्थांचीही मदत घेऊन महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा अहवाल तयार केला आहे. त्याचे सादरीकरण महाकवी कालिदास कला मंदिरात करण्यात येणार आहे.