करोनाविषयी शिबिरांमधून शिक्षक, पालकांचे प्रबोधन

नाशिक  : करोना संकटाला वेगवेगळ्या पातळीवर तोंड देत असताना शैक्षणिक क्षेत्रावर याचा प्रभाव प्रामुख्याने जाणवत आहे. सर्वसामान्य बालकांप्रमाणे अपंग बालकांनाही वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अडचणींचा डोंगर पाहता जिल्ह्य़ातील अपंग बालकांच्या शाळांनी ‘ऑनलाइन’ शिक्षणाचा पर्याय नाकारला असून शाळा जेव्हा पूर्ववत सुरू होतील, त्याच वेळी विद्यार्थी शाळेत येतील, अशी भूमिका घेतली आहे. शाळेत येताना पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यात कुठल्याही प्रकारे करोनाची भीती असू नये यासाठी प्रबोधन शिबिरांच्या माध्यमातून काम सुरू आहे.

राज्य पातळीवर करोनाचा संसर्ग वाढतच आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत नवीन शैक्षणिक वर्षांचा श्रीगणेशा ऑनलाइन पद्धतीने झाला आहे. सर्वसामान्य विद्यार्थी, पालकांना ऑनलाइन शिक्षणात अनेक व्यत्यय येत आहेत. अंध, अपंग बालकांचे तर प्रश्नच वेगळे आहेत. अंधांना दिसत नसल्याने तर अपंगांना सर्वसामान्यांप्रमाणे तातडीने हालचाली करणे शक्य नसल्याने शहर परिसरातील १३ पेक्षा अधिक विशेष शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय नाकारला आहे. याबाबत शाळांकडून पालक आणि विद्यार्थ्यांचे सव्‍‌र्हेक्षण करण्यात आले.

पालक, विद्यार्थ्यांमध्ये करोनाविषयी भीती असून शाळेत येण्यास ते तयार नाहीत. अंध बालकांना प्रत्येक गोष्ट स्पर्शाने शिकवणे आवश्यक असते. करोना पथ्यात कुठल्याही गोष्टीला स्पर्श करू नका, असे नमूद आहे. शारीरिक अंतराचे पथ्य सांभाळून शिकवणे, पांढरी काठी निजंतुकीकरण, त्या बालकांना वसतिगृह किंवा शाळेच्या वर्गात शिकवणे अवघड आहे. अपंग विद्यार्थ्यांच्या बाबतीत अनेक अडचणी आहेत. भ्रमणध्वनी, लॅपटॉप, संगणक हाताळणी, त्यांची बसण्याची क्षमता, त्यांना हालचाल करण्यासाठी मदत अशा वेगवेगळ्या समस्या त्यांच्यापुढे आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय अनेकांनी नाकारला आहे.

दुसरीकडे, शाळा स्तरांवरही जागरूकता दाखविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शारीरिक अंतर, निर्जंतुकीकरण, आसनावर एकच विद्यार्थी असा वाढता खर्च पाहता सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शाळा ज्या वेळी सुरू होतील. त्यानंतरच अपंगांच्या शाळा सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे. तोपर्यंत मिळालेल्या वेळेचा वापर शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मनात करोनाविषयी असणारी भीती घालविण्यासाठी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रबोधन शिबीर घेण्यात येत आहे.

शहरासह आदिवासी भागांमध्येही हे शिबीर सुरू आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर काय काळजी घ्यावी, आहार-विहार कसा असावा, मानसिक मनोबल कसे वाढवावे, याबाबत माहिती देण्यात येत असून सर्वाचा या वर्गाला प्रतिसाद लाभत आहे.

बेन्जन देसाई फाउंडेशनचे प्राचार्य तसेच मानसोपचारतज्ज्ञ अश्विनकुमार भारद्वाज, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे डॉ. सारंग इंगळे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांची समिती गठित करून विद्यार्थी, पालक, शिक्षकांच्या मनातील भीती दूर करण्यात येत आहे. करोनासोबत जगण्याची मानसिकता तयार करण्यात येत असून शारीरिक दृष्टय़ा ते सक्षम कसे होतील यासाठी प्रयत्न होत आहे. शहरातील शाळांसोबत पेठ, सुरगाणा, हरसूल परिसरात प्रबोधन शिबीर सुरू आहे. शासनाकडून अद्याप अंध, अपंग शाळांसाठी विशेष सूचना आलेल्या नाहीत. सर्वसामान्य शाळांप्रमाणे सूचना आल्या आहेत. त्यामुळे शासन या विशेष बालकांसाठी काय भूमिका घेते, याकडे लक्ष आहे.

– मुक्तेश्वर मुनशेट्टीवार (नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड)