नाशिक जिल्ह्य़ातील १५ पैकी १० तालुक्यांमध्ये आतापर्यंत करोनाचा फैलाव झाला असून शुक्रवारी ११ नवे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्य़ातील करोना बाधितांची संख्या ७६९ वर पोहचली आहे. त्यात मालेगावातील ६१६ रुग्णांचा समावेश आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीस पहिल्यांदा निफाड तालुक्यातील लासलगाव येथील एका तरुणास करोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर सहा एप्रिल रोजी नाशिकच्या गोविंद नगरातील व्यक्ती बाधित असल्याचे उघड झाले होते. पाठोपाठ आठ एप्रिल रोजी मालेगावातील चार आणि चांदवड येथील एक असे पाच जण एकाच दिवशी बाधित असल्याचे आढळून आल्याने जिल्हा हादरला होता. त्यानंतर मालेगावात जवळपास रोजच नवे रुग्ण आढळून येत असून सव्वा महिन्याच्या कालावधीत शहरात ६०० आणि ग्रामीण भागात १६ असे एकूण ६१६ करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. प्रारंभी केवळ तीन, चार तालुक्यांपुरता मर्यादित असलेला करोनाचा हळूहळू जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये शिरकाव झाल्याने चिंता वाढत आहे. यातील सर्वाधिक ६१६ रुग्ण संख्या मालेगावची असून त्यानंतर नाशिक तालुका ५०, येवला ३३, निफाड १३, दिंडोरी नऊ, सिन्नर सात, चांदवड चार, नांदगाव चार, सटाणा दोन आणि कळवण एक अशी रुग्ण संख्या आहे. त्र्यंबकेश्वर, देवळा,इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा या पाच तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही, हीच काय ती दिलासादायक बाब होय.

मालेगाव, दिंडोरी, सिन्नरमध्ये रुग्ण

शुक्रवारी दोन टप्प्यात एकूण १९५ तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यात ११ अहवाल सकारात्मक असून १८४ नकारात्मक आहेत. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मालेगावातील समतानगर मधील दोन पुरुष, एकतानगर मधील एक पुरुष, सावतानगर मधील महिला, हिम्मतनगर मधील पुरुष तसेच शहरातील अन्य दोन पुरुष रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील एक महिला आणि इंदोरे येथील दोन पुरुष आणि सिन्नर तालुक्यातील एक पुरुष रुग्ण करोनाबाधित असल्याचे उघड झाले आहे.