महानगर गॅस कंपनीकडे ४५ कोटी बाकी

नाशिक : रस्त्यांवरील खोदकामांमुळे पावसाळ्यात वाहनधारक आणि पादचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असून लहान-मोठे अपघातही होत आहेत. महानगर गॅस कंपनीने शहरात २०५ किलोमीटर रस्त्यांवर खोदकामासाठी परवानगी घेतली. त्यापोटी १२५ कोटी रुपये भरणे अपेक्षित होते. तथापि, आतापर्यंत के वळ ८० कोटी भरले आहेत.  या कंपनीकडून आधी बाकी असणारी रक्कम घ्यावी तसेच पावसाळ्यात खोदकामे त्वरित थांबविण्याचे निर्देश स्थायी सभापती गणेश गीते यांनी दिले. माती, मुरूम टाकून बुजविलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३० कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा काढण्याचे सूचित करण्यात आले.

मंगळवारी स्थायी समितीची सभा सभापती गीते यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने झाली. शहरातील बहुतांश रस्त्यांवरील खोदकामाचा विषय काही महिन्यांपासून गाजत आहे. सर्वसाधारण सभेत महापौरांनी खोदकामे थांबविण्याचे आदेश दिले होते. काही भागात ही कामे थांबली असली तरी आजही अनेक भागात वेगवेगळ्या कारणास्तव खोदकाम सुरू आहे. स्थायीच्या बैठकीत तो मुद्दा पुन्हा उपस्थित झाला.

पाथर्डी फाटा, अंबड परिसरात दुभाजकासाठी डांबरी रस्ते खोदले गेले. त्यामुळे लहान-मोठे अपघात होत असून पावसाळ्यात खोदकामे थांबविण्याची गरज त्यांनी व्यक्त के ली.  महानगर गॅस कंपनीच्या खोदकामाचा विषयही चर्चेत आला. या कंपनीने गॅस वाहिनीसाठी २०५ किलोमीटरच्या रस्त्यांवर खोदकामासाठी परवानगी घेतलेली आहे. संबंधितांचे ८० किलोमीटर रस्त्यांवरील खोदकाम झाले असून उर्वरित १२५ किलोमीटर रस्त्यांवर वाहिनी टाकण्याचे काम बाकी आहे. आधीच खोदलेल्या रस्त्यांच्या काठीवरील भागात डांबरीकरण झालेले नाही. केवळ मुरूम, माती टाकून ते बुजविले गेल्याकडे लक्ष वेधले गेले.

सभापती गीते यांनी गॅस कंपनीने रस्ते खोदकामासाठी अद्याप पूर्ण रक्कमही भरली नसल्याचे नमूद केले. रस्ते खोदकामापोटी कंपनीने १२५ कोटी रुपये महापालिकेकडे भरायचे होते. त्यापैकी आतापर्यंत केवळ ८० कोटी रुपयांचा भरणा केला गेला. कंपनीकडे ४५ कोटी रुपये अद्याप बाकी आहे. त्यातही शुल्काची रक्कम जुन्या दराने निश्चित केली गेली. ती नव्या दराने निश्चित करण्याची गरज व्यक्त केली. कंपनीकडे बाकी असणारी रक्कम प्राप्त करावी आणि शहरात कुठल्याही कारणासाठी नव्याने खोदकाम करू नये, असे निर्देश सभापतींनी दिले. रस्त्याच्या काठांचे डांबरीकरण व दुरुस्तीसाठी ३० कोटींची तरतूद आहे. या कामाच्या निविदा तातडीने काढून रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे आदेशही देण्यात आले.