टाळेबंदीची कठोर अंमलबजावणी, विनाकारण भटकणाऱ्यांवर कारवाई

नाशिक : शहरात करोनाचा उंचावणारा आलेख लक्षात घेऊन सायंकाळी सात ते पहाटे पाच या कालावधीत टाळेबंदीच्या कठोर अंमलबजावणीला बुधवारपासून सुरूवात झाली. मध्यवर्ती बाजारपेठेसह उपनगरांमधील दुकाने सायंकाळी पाच वाजता बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळेनंतर जी दुकाने उघडी राहिली, त्यांचे छायाचित्र टिपण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणारे दुचाकी, चारचाकी वाहनधारकांविरोधात कारवाईला अधिक गती देण्यात आली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांविरूध्द कारवाईला सुरूवात झाली.

टाळेबंदी शिथील झाल्यानंतर बाजारपेठांमध्ये सातत्याने गर्दी होत असून मुखपट्टी परिधान करणे वा सुरक्षित अंतर राखण्याचे पथ्यही बाजूला पडले आहे. बाजारपेठांमधील गर्दी करोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारक ठरत असून  दाट लोकवस्तीच्या भागात समूह संसर्गाची धास्ती आहे. या संदर्भातील आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सायंकाळी सात ते पहाटे पाच या कालावधीत संचारबंदी कडक करण्याचे निर्देश दिले.

करोनाचा संसर्ग आता सर्वदूर पसरत असून मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव होणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे अनावश्यक फिरणाऱ्यांना चाप लावण्याच्या दिशेने पोलिसांनी पावले उचलण्यास सुरूवात केली. मागील आठवडय़ात व्यापारी संघटनांनी सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेने गर्दी कमी करण्यासाठी तसे आवाहन केले.

बहुतांश दुकाने पाच वाजता बंद झाली. परंतु, काही दुकाने सुरूच राहिली. वाहतूक पोलिसांनी अशा दुकानांचे छायाचित्र घेऊन कारवाईची तयारी केली आहे. पाच वाजेनंतर अनेक भागात शुकशुकाट जाणवू लागला. सातपर्यंत फिरण्याची मुभा असली तरी वाहनांची वर्दळ कमी झाली होती.

टाळेबंदीत दुचाकीवर एकाने प्रवास करावा आणि चारचाकीमध्ये दोन अधिक चालक असा नियम आहे. परंतु, त्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. अशा वाहनधारकांवर दिवसभर कारवाई केली गेली. या शिवाय संचारबंदीच्या काळात विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरू झाले. या कारवाईतून जीवनावश्यक बाबींशी संबंधित व्यक्ती तसेच रात्रपाळीवरील औद्योगिक आस्थापनांमधील कामगार यांना वगळण्यात आले आहे. सवलतींचा कोणी गैरफायदा घेताना आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या नांवे फिरणारा संदेश बनावट

करोना आता तिसऱ्या टप्प्यात पोहचत असून सर्वाना अतिदक्षता पाळायची असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांच्या नांवे समाजमाध्यमात पसरलेला संदेश बनावट असल्याचे खुद्द जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. संदेशात चिकन, मटण बंद, कोणासोबत फिरणेही बंद, बाहेरील व्यक्तीला घरात कोणत्याही कारणासाठी घेऊ नये अशा अनेक बनावट सूचना दिल्या गेल्या. याआधी असे बनावट संदेश समाज माध्यमात पसरले होते. हा संदेशही त्याचा भाग असल्याचे प्रशासनाच्या माहितीनंतर उघड झाले. बनावट संदेशात शुध्दलेखनाच्या असंख्य चुका आहेत. तो धागा पकडून मांढरे यांनी शुध्दलेखनाच्या इतक्या चुका आपल्याकडून झोपेतही होणार नसल्याचे नमूद केले.