शहरातील घटनांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांचे विश्लेषण

नाशिक : रक्त वाहिन्यांची लवचीकता ४० वर्षांनंतर वयोमानाप्रमाणे कमी होत असते. बदललेली जीवनशैली, आनुवांशिकता अथवा ‘जेनेटिक स्ट्रर’मधील बदल हे यामागील कारण. ३० ते ५० वयोगटात रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी झाल्यामुळे या वयात गुठळी झाल्याने हृदयक्रिया बंद पडून मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. या वयोगटात केशवाहिन्यांचे जाळे तयार न झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन रुग्णांचा मृत्यू होतो. तरुण वयात शरीरातील घडामोडींची तपासणी केली जात नसल्याने संसर्ग लवकर होतो. काम करताना ते लक्षात येत नाही. रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्यामुळे ‘हायपॉक्सिया’ तसेच उभ्या उभ्या काम केल्यामुळे ‘हायपोटेन्शन’ यामुळे रुग्ण अकस्मात धक्का बसून जागीच कोसळतो.

करोना संसर्गाचे भय कायम असताना शहरात अकस्मात मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येऊन पडून मृत्यू असे प्रकार वाढले आहेत. यात ३० ते ५० वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. या वयोगटात घडणाऱ्या घटनांची कारणिममासा मनपाचे क्षयरोग अधिकारी डॉ. कल्पना कुटे यांनी केली. या वयोगटातील व्यक्ती नोकरी, कामाच्या निमित्ताने सतत फिरतीवर असतात. त्यामुळे करोना संसर्गाची लागण होण्याची शक्यता त्यांच्यात खूप जास्त असते.

अधिक संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये अनेकदा गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसतात. वेळीच उपचार व मदत मिळाल्यास त्यांचा जीव वाचविता येतो. तरुण वयोगटाची जीवनशैली बदलली आहे. बैठे काम, व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या पद्धती, उन्हात काम न करणे (ड जीवनसत्वाचा अभाव), धुम्रपान, तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन, शरीरसौष्ठवासाठी उत्तेजक औषधांचा अविरत वापर, स्थूलता या सर्व कारणांमुळे कमी झालेली प्रतिकारक्षमता, या कारणांमुळे संसर्ग झाल्यावर प्रकृती गंभीर होण्यास हातभार लागतो.

रक्तवाहिन्यांमध्ये कडकपणा आल्यामुळे तरुण वयात गठुळी होऊन हृदयक्रि या बंद पडल्याने मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.

या संदर्भातील संशोधनात ५० वर्षांवरील रुग्णांमध्ये मुख्य रक्तवाहिनीत अडथळे आले तरी केश वाहिन्यांचे जाळे तयार झालेले असल्यामुळे रक्तवाहिन्यांत गुठळी अडकली तरी शरीराचे रक्तप्रवाहाचे काम थांबत नाही. त्यामुळे या रुग्णांचे मृत्यू प्रमाण कमी आहे, याकडे डॉ. कुटे यांनी लक्ष वेधले. तरूण वयात शरीराच्या आतील घडामोडी तपासल्या जात नाहीत. त्यामुळे मधुमेह, थायरॉईड ग्रंथी, कर्करोग, मूत्रपिंड अथवा एखादा अवयव खराब झाला याचा अंदाज नसतो. या रुग्णांना पटकन संसर्ग होतो. काम करतांना तो लक्षात येत नाही आणि अकस्मात काहीतरी घडते.

ज्या रक्तवाहिनी वा अवयवात गुठळी अडकते, त्याला ती दुखापत करते. हृदयात अडकली तर हृदयविकाराचा  झटका येतो. मेंदूत अडकल्यास पक्षघाताचा झटका येतो. कमी वयातील मुलांत केशवाहिन्यांचे जाळे तयार न झाल्यामुळे अकाली मृत्यू होत आहेत. करोना पश्चात संसर्गात सहा महिन्यांनी हे प्रमाण दिसत आहे. ते अतिशय गंभीर आहे. हा धोका टाळण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून रक्त पातळ होण्यासाठीचे आवश्यक इंजेक्शन अथवा गोळ्या, त्यांच्या निगराणीखाली घेणे अत्यंत आवश्यक आहे.

डॉ. कल्पना कुटे

(संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग तथा क्षयरोग अधिकारी, मनपा)