19 March 2019

News Flash

महिलांवरील अंधश्रद्धेचा पगडा कधी दूर होणार?

अंधश्रद्धेचा पगडा दूर झाल्यास महिला या दृष्टचक्रातून बाहेर पडू शकतात.

जादूटोणाविरोधी कायद्यान्वये राज्यात ५०० हून अधिक गुन्हे दाखल

स्थळ – दिंडोरी तालुक्यातील पाडय़ावरील मंदिर. बहिणीच्या मुलावर गावठी उपचार करण्यासाठी वैद्याकडे संपूर्ण कुटुंब जाते. मुलावर  अघोरी उपचार होतात. कुटुंबीयांना पहाट उजाडण्यापूर्वी जाण्यास सांगितले जाते. कुटुंब जात असताना दोन अल्पवयीन मुली मंदिरात थांबतात. या वेळी बुवाबाजी करणारे दोन संशयित त्यांच्यावर अत्याचार करतात. जिवे मारण्याची धमकी देत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतात.

उपरोक्त घटनेतून अंधश्रद्धेच्या पगडय़ामुळे महिलांचे शारीरिक, आर्थिक, मानसिकरीत्या होणारे शोषण ठळकपणे समोर येते. शहर, ग्रामीण भागातील महिलांवर अंधश्रद्धेचे गारूड आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारींची संख्या कमी असली तरी नाकारण्यासारखी नाही. राज्यात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत ५०० हून अधिक गुन्हे दाखल असून त्यात ८० टक्के महिलांशी निगडित आहेत. अंधश्रद्धेचा पगडा दूर झाल्यास महिला या दृष्टचक्रातून बाहेर पडू शकतात.

एकविसाव्या शतकात अंधश्रद्धा तसेच भोंदूबाबा, बुवाबाजी करणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मूल होत नाही म्हणून आधुनिक वैद्यकशास्त्राऐवजी आजही अनेक महिलांना नवस, व्रतवैकल्य किंवा कोणी भोंदूबाबाचा सल्ला, उपचार महत्त्वाचा वाटतो. दुसरीकडे काळी जादू किंवा अघोरी विद्येने पैशांचा पाऊस किंवा गंडविणाऱ्यांची संख्याही कमी नाही. काही ठिकाणी हे उपचार जेव्हा शारीरिक, आर्थिक शोषणासह जिवावर बेतू लागतात, तेव्हा या पगडय़ातून बाहेर पडण्याची धडपड सुरू होते. विशेषत: या घडामोडीत महिला वर्ग भरडला जात असल्याचे लक्षात येते. या संदर्भात जिल्ह्य़ात वर्षांला साध़ारणत: तीन ते चार प्रकरणे तसेच शहर परिसरात बोटावर मोजण्याइतकी प्रकरणे पोलीस ठाण्यात दाखल होत असली तरी या ठिकाणी न येणाऱ्या प्रकरणांचा विचार करावा लागेल. जादूटोणाविरोधी कायद्यान्वये दाखल झालेल्या प्रकरणांचा आढावा घेतल्यास महिलांवरील अंधश्रद्धेचे गारूड ठळकपणे अधोरेखित होते.

ही बाब पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी मान्य केली. महिलांमध्ये अंधश्रद्धा आहे. ती नाकारता येणार नाही. त्यामुळे वेगवेगळ्या भूलथापांना त्या बळी पडतात. ग्रामीणच्या तुलनेत हे प्रमाण शहरात अत्यल्प आहे. ही आकडेवारी लक्षात घेता पोलीस यंत्रणा वेगवेगळ्या शिबिरात या विषयावर व्याख्याने घेऊन महिलांना बुवाबाजीपासून सजग राहण्याविषयी मार्गदर्शन करते. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनीही ग्रामीण भागात विशेषत: महिलांवरील अंधश्रद्धेचा पगडा हा त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांमुळे अधिकच घट्ट होत असल्याचे नमूद केले. अशी काही प्रकरणे पोलीस ठाण्यात दाखल होतात. वेगवेगळ्या मोहिमेच्या माध्यमातून बुवाबाजी, भोंदूबाबांवर कारवाई सुरू असते. महिलांनी असे संशयित आढळल्यास ग्रामीण पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महिला या अंधश्रद्धेच्या वाहक असल्याने त्या वेगवेगळ्या भूलथापांना सहज बळी पडतात, याकडे लक्ष वेधले. जादूटोणा, बुवाबाजी, अघोरी सल्ल्यावर त्यांचा सहज विश्वास बसत असल्याने त्या भोंदूबाबाच्या जाळ्यात अलगद सापडतात. काही वेळा पारंपरिक चालीरीती ‘जट काढणे’, मासिक पाळीच्या वेळी बाजूला बसणे अशा काही कारणांनी त्यांचे समाजकंटकाकडून शोषण होते. स्त्रियांनी यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही घटनेची वैज्ञानिक मीमांसा करणे गरजेचे आहे. त्यामागील कारणांचा शोध घेत या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचे आवाहन अंनिसने केले आहे.

अंधश्रध्देतून तिला बंधनात ठेवण्याचा प्रयत्न

राज्यात जादू टोणा विरोधी कायद्यांतर्गत ५०० हून अधिक प्रकरणे दाखल झाली आहेत. यातील पीडित महिलांची संख्या ८० टक्के आहे. अंधश्रध्देचा आधार घेत स्त्रियांचे आर्थिक-मानसिक-शारीरिक  शोषण करण्यात येते. तिला बंधनात ठेवत अडकवले जाते. ही बंधने, चालीरिती झुगारत स्त्रीयांनी विज्ञानवादी विचारांची कास धरण्याची गरज आहे.

कृष्णा चांदगुडे, समन्वय, अंधश्रध्दा निर्मूलन समिती

First Published on March 8, 2018 1:52 am

Web Title: superstitions dominance on women superstition crime