कृषिमंत्री दादा भुसे यांचे आवाहन

नाशिक : जिल्ह्य़ात करोनाचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. नागरिकांनी या आजाराला घाबरून न जाता पुढील १५ दिवस आवश्यक ती काळजी घ्यावी. आवश्यकता नसेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.

सोमवारी सकाळी मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी जिल्ह्य़ातील स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर भुसे बोलत होते.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. या आजारापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना महत्त्वाच्या आहेत. प्रत्येकाने स्वच्छता बाळगावी. महानगरपालिका, पंचायत समितीच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवावे. आवश्यक तेथे धुरळणी, फवारणी करावी तसेच सामान्य नागरिकांना माहितीसाठी शास्त्रीय माहिती सोप्या, सुलभ भाषेत असलेली माहिती पत्रके प्रसिद्ध करावीत, असेही भुसे यांनी सूचित केले.

आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे. त्यांच्या सुटय़ा, रजा रद्द करण्यात आल्या असल्याचे भुसे यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालय, मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात करोनाची माहिती देण्यासाठी कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तेथे वैद्यकीय तज्ज्ञांची नियुक्ती करावी. प्रत्येक विभागाने आढावा बैठक घेऊन करोनाबाबत गावोगावी जनजागृती करावी. मास्क, सॅनिटायझर यांचा काळाबाजार होणार नाही, अशी दक्षता घ्यावी. त्यासाठी संबंधित विक्रेत्यांची महसूल, पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने संयुक्त बैठक बोलवावी, असेही भुसे यांनी म्हटले आहे. मालेगाव आणि नाशिक येथील रुग्णालयात विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तेथे आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. आवश्यकता भासल्यास खासगी वैद्यकीय व्यावसायिक आणि रुग्णालयांची मदत घ्यावी, असे निर्देश भुसे यांनी दिले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त राहुल मर्ढेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. सायिका अन्सारी, डॉ. त्रिभुवन, डॉ. हितेश महाले आदी उपस्थित होते. करोनाच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागातर्फे सुरू असलेल्या उपाय योजनांची माहिती यावेळी मांडण्यात आली.