चांदोरीतील मंदिरांचे तांत्रिक सर्वेक्षण; ‘टेकिंग टू मासेस’ अंतर्गत विविध उपक्रम
शेकडो वर्षांपासून गोदावरीतील पाण्याच्या प्रवाहाला तोंड देणाऱ्या आणि यंदा दुष्काळामुळे शुष्क पात्रात नजरेस पडणाऱ्या निफाड तालुक्यातील चांदोरीच्या हेमाडपंथीय मंदिरांच्या संवर्धनासाठी स्थानिक वास्तुविशारदांनी पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत या मंदिरांचे तांत्रिक सर्वेक्षण करण्यात आले असून संवर्धनासाठी उपाययोजना सुचविल्या जाणार आहेत.
सर्वसामान्यांच्या जीवनात डिझाईन अर्थात रचनेचे असणारे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन इंटेरियर डिझायनर्सच्या वतीने देशभरातील प्रमुख शहरांतून डिझाइन यात्रा काढण्यात आली आहे. नाशिकमध्ये आगमन झालेली ही डिझाइन यात्रा ७ एप्रिलपर्यंत ‘टेकिंग टू मासेस’ या संकल्पनेवर विविध उपक्रम राबवीत आहे.
दुष्काळामुळे सध्या गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. यामुळे एरवी पाण्यात असणारी चांदोरी येथील गोदापात्रातील हेमाडपंथीय मंदिरे दृष्टिपथास पडत आहेत. ग्रामस्थांच्या मागणीनुसार चांदोरीचा डिझाइन यात्रेत समावेश करण्यात आला. त्या अनुषंगाने संस्थेच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष हेमंत दुगड, संजय पाटील यांच्यासह २० वास्तुविशारदांनी सरपंच संदीप टर्ले व अन्य ग्रामस्थांच्या सोबतीने या मंदिरांचे सर्वेक्षण केले.
या मंदिरांविषयी कोणतेही दस्तावेज उपलब्ध नाहीत. त्यांची बांधणी नेमक्या कोणत्या काळात झाली त्याची स्पष्टता होत नाही. सातत्याने पाण्याखाली राहिल्यामुळे हेमाडपंथीय मंदिरांचे बरेच नुकसान झाल्याचे वास्तुविशारदांच्या निदर्शनास आले.
काळ्या पाषाणात निर्मिलेल्या या नऊ मंदिरांचे दस्तावेजीकरण करणे गरजेचे होते. त्यामुळे संस्थेने प्रथम छायाचित्रण करून सद्य:स्थितीचे शास्त्रीय पद्धतीने रेखांकन केले. या मंदिरासारखी कुठेही अशाच मंदिरांची उभारणी करावयाची झाल्यास ‘व्हर्टिकल ड्रॉइंग’ अर्थात विशिष्ट पद्धतीने रेखांकन नकाशा आवश्यक असतो. ही रेखांकने झाल्यावर प्रत्येक मंदिराची दुरुस्ती कशी करता येईल याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रायोजकाच्या माध्यमातून खर्च केला जाईल.
प्राचीन ठेवा जतन व्हावा हा या सर्वामागील उद्देश असल्याचे दुगड यांनी नमूद केले. या उपक्रमात संस्थेच्या सुप्रिया नाथे, राकेश लोया, वैशाली प्रधान, रुपाली जायखेडकर, सागर काबरे आदी वास्तुविशारद सहभागी झाले.

संकल्पना स्पर्धा
डिझाइन यात्रा उपक्रमांतर्गत १ ते ५ एप्रिल या कालावधीत वास्तुविशारदचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संकल्पना स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आयडिया महाविद्यालय व कान्स महाविद्यालयात ही स्पर्धा होईल. स्पर्धेत सार्वजनिक कचराकुंडय़ा, पदपथ, बागेतील बाकडे, झाडाभोवती संरक्षक जाळ्या, सार्वजनिक प्रसाधनगृह यांना नवे रूप कसे देता येईल यासाठी प्रतिकृती आणि आराखडे सादर केले जाणार आहेत. अलीकडेच या उपक्रमांतर्गत वास्तुविशारद व कलाकारांनी शहरातील निरीक्षण गृह व आधाराश्रम येथे संस्थांच्या प्रवेशद्वार आणि दर्शनी भागात भिंतींना रंग व चित्रांच्या माध्यमातून ‘वॉल ग्राफिटी’ या प्रकाराने नवे रूप दिले. कलाकार अनिकेत महाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही चित्रे रेखाटली. त्याद्वारे पाणी वाचवा व अन्य सामाजिक संदेशही दिले गेले.