नाशिक पुन्हा गारठले, थंडी लांबण्याचा विक्रम

काही दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचे पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन झाले असून वाऱ्याचा वेग वाढल्याने दिवसादेखील हुडहुडी भरणाऱ्या थंडीची अनुभूती नाशिककर घेत आहेत. पाच दिवसांत नाशिकचे तापमान ३.४ अंशांनी कमी झाले. जानेवारीअखेपर्यंत कायम राहिलेल्या थंडीने सर्वाधिक काळ मुक्काम करण्याचा जणू विक्रम नोंदवला आहे. दुसरीकडे वातावरणातील बदलाने द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत.

थंडीमुळे पुन्हा एकदा शहर परिसर, ग्रामीण भाग गारठला आहे. दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या सुमारास नीचांकी पातळीची नोंद होते. यंदा ती डिसेंबरच्या अखेरीस झाली. दिवाळीपासून शहर-परिसरात गारव्याची अनुभूती मिळत आहे. डिसेंबरमध्ये तापमानाने नीचांकी पातळी गाठण्यास सुरुवात केली. उत्तर भारतातील शीत लहरींचा प्रभाव नाशिकच्या वातावरणावर पडतो.

मागील दोन महिन्यांत काही अपवाद वगळता तापमान ५.१ ते १३ अंशाच्या दरम्यान राहिले. याच काळात २९ डिसेंबर रोजी हंगामातील नीचांकी ५.१ अंशाची नोंद झाली. एरवी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात नीचांकी तापमान नोंदले जाते. या हंगामाने त्यास छेद दिला. डिसेंबर, जानेवारी हे दोन्ही महिने थंडीचे राहिले. गेल्या आठवडय़ात तापमान काहीसे म्हणजे १२ अंशावर गेल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला होता, परंतु तो अल्पकाळ टिकला. लगेचच तापमान पुन्हा आठ ते नऊ अंशाच्या आसपास आले. उत्तर भारतात शीत लहर पसरली आहे. त्या भागातून वाहत येणाऱ्या वाऱ्यामुळे या घडामोडी घडल्याचे तज्ज्ञ सांगतात. रविवारच्या ८.१ अंशाच्या तुलनेत सोमवारी पारा ९.४ अंशावर पोहोचला, परंतु दिवसा बोचरा वारा वाहत असल्याने कमालीचा गारवा जाणवत आहे.

मनमाडमध्ये तापमानात साडेसहा अंशांनी घट झाली. तापमानातील चढ-उतार, मध्येच ढगाचे सावट त्यामुळे दिवसा उष्मा, रात्री थंडी अशी स्थिती होती. यामुळे गेल्या आठवडय़ात अंतर्धान पावलेली थंडी पुन्हा परतली आहे. अचानक गारठा वाढला. शिवाय दिवसाही गार वारे वाहू लागल्याने थंडीचा कडाका चांगलाच जाणवू लागला आहे. पुढील दोन-तीन दिवसांत थंडी आणखी वाढणार असल्याने नागरिक त्रस्त झाले. बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावरही होत आहे. डिसेंबर महिन्यात तापमान पाच अंशापर्यंत घसरल्याने द्राक्ष उत्पादक धास्तावले होते. आता पारा नऊ अंशावर असल्याने तो आणखी खाली जातो की काय, ही चिंता त्यांना सतावत आहे. द्राक्ष काढणीला बहुतांश भागात सुरुवात झालेली आहे. आधीच थंडीचा परिणाम द्राक्षाच्या विकासावर झाला होता. द्राक्ष बागांची वाढ संथ झाली. अपेक्षित साखर न उतरल्याने काढणी लांबणीवर पडली. या स्थितीत तापमान पुन्हा खाली घसरणे परवडणारे नसल्याची उत्पादकांची भावना आहे.