इगतपुरी मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकरांना प्रलोभन दाखविले गेल्याच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून जिल्ह्य़ातील काँग्रेसचे हे एकमेव आमदार आता मुंबईमार्गे थेट जयपूरला रवाना झाले, तर शिवसेनेचे दोन आमदार मुंबईत, तर भाजपचे सर्व आमदार दिवसभर नाशिकमध्येच होते.

मुख्यमंत्री पदावरून सेना-भाजपमध्ये निर्माण झालेला सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसल्याने शुक्रवारी राजकीय घडामोडींना वेग आला. सत्ताधारी भाजप विरोधकांसह सेनेचे आमदार फोडण्याच्या प्रयत्नात असल्याचे आरोप त्या त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केल्यामुळे अखेरच्या टप्प्यात घोडे बाजाराला ऊत आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मात्र भाजप नेत्यांनी हे आरोप खोडून काढले.

या घडामोडींचा संबंध नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघाशी जोडला गेला. या मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार हिरामण खोसकर यांना भाजपकडून कोटय़वधीचे प्रलोभन दाखविले गेल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खोसकर यांनी कोणीतरी कार्यकर्ते मध्यस्ती करायला आले होते. मुंबईत वरिष्ठांशी वाटाघाटी करायला न्यायचे असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. परंतु आपली आणि त्यांची भेट झाली नसल्याचे खोसकर म्हणाले. दुपारनंतर खोसकर यांचा भ्रमणध्वनी बंद झाला. काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी ते मुंबईमार्गे जयपूरला रवाना झाल्याचे सांगितले.

खोसकरांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप नेत्यांशी संबंधित काहींनी त्यांना प्रलोभन दाखविल्याचे आहेर यांनी नमूद केले. राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी त्यास दुजोरा दिला. आपल्या आमदारांची पळवापळवी होऊ नये म्हणून काँग्रेसने अनेक आमदारांना राजस्थानमध्ये रवाना केले आहे. यामध्ये खोसकर यांचाही समावेश आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्य़ात सहा आमदार आहेत. या पक्षाचे आमदार आपआपल्या मतदारसंघात आहेत. ज्यांना पक्ष सोडून जायचे होते, ते निवडणुकीपूर्वीच निघून गेले आहेत. आता जे निवडून आले, त्यातील कोणीही फुटणार नाही, असे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी सांगितले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना आपआपल्या मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागाची पाहण्याची सूचना केली. त्यानुसार माजी मंत्री छगन भुजबळ, सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे आपआपल्या मतदारसंघात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करीत आहेत. राष्ट्रवादीला आमदार फुटण्याची भीती नसल्याचेही ते म्हणाले.

भाजपचे जिल्ह्य़ात पाच आमदार असून हे सर्व आमदार आपआपल्या मतदारसंघात आहेत. त्यास आमदार सीमा हिरे आणि देवयानी फरांदे यांनी दुजोरा दिला. निरोप मिळाल्यावर मुंबईला रवाना होण्यासाठी त्यांची तयारी आहे. मित्रपक्ष सेनेचे जिल्ह्य़ात राज्यमंत्री दादा भुसे आणि सुहास कांदे हे दोन आमदार आहेत. शिवसेनेने आपल्या आमदारांना आधीच मुंबईत बोलावले आहे. सेनेला फोडाफोडीची चिंता नाही. केवळ पक्ष नेतृत्वाला सर्वाशी संवाद साधणे सोपे व्हावे, म्हणून सर्व आमदार मुंबईत एकत्रित असल्याचे भुसे यांनी सांगितले. पोलिसांत तक्रार नाही

काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना प्रलोभन दाखविले गेल्याचे आरोप झाले. या आरोपात तथ्य नसल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. या संदर्भात ग्रामीण पोलिसांकडे कोणतीही तक्रार केली गेलेली नाही. तक्रारच नसल्याने तपासाचा प्रश्न नसल्याचे ग्रामीण पोलीस दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्य़ातील नवनिर्वाचित आमदारांना अद्याप पोलीस संरक्षण दिले गेलेले नाही. त्यांच्याकडून मागणी झाली नसल्याने आमदारांना पोलीस संरक्षण दिले गेले नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.