ठाण्यातील चेकमेट सव्‍‌र्हिसेस या खासगी वित्त कंपनीत पडलेल्या नऊ कोटींच्या दरोडा प्रकरणात ठाणे पोलिसांनी बुधवारी रात्रभर शहरातील सातपूर परिसरात शोधमोहीम राबवत एका हॉटेलमधून काही संशयितांना ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. शोधमोहीम राबविली गेल्याचे मान्य करत किती संशयित पकडले गेले, याबद्दल माहिती नसल्याचे नाशिक पोलिसांनी म्हटले आहे. ठाणे येथील तीन हातनाका भागातील हरदीप इमारतीत असलेल्या चेकमेट कंपनीच्या कार्यालयात मंगळवारी पहाटे दरोडा पडला. या कंपनीतून नऊ कोटी १६ लाखांची रोकड दरोडेखोरांनी लंपास केली. संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात करत एका संशयिताला आधीच ताब्यात घेतले होते. त्यानंतर विशेष पथक बुधवारी थेट नाशिकमध्ये धडकले. सातपूर व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत उपरोक्त प्रकरणातील संशयित लपल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे ठाणे पोलिसांनी नाशिक शहर पोलिसांची मदत न घेता परिसरातील हॉटेल व तत्सम ठिकाणांची छाननी केल्याचे स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात आले. ग्रामीण भागातही काही ठिकाणी उपरोक्त पथकाने संशयितांचा शोध घेतला. त्यात काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संबंधितांनी कोणाला ताब्यात घेतले याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.