करोनाग्रस्त पोलीस महिनाभरापासून घराच्या संपर्कात नसल्याने निर्णय

नाशिक : मालेगाव येथे बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळून परतलेल्या आणि सकारात्मक आढळलेल्या पोलिसांचा महिनाभरापासून शहरात वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबाशी, घराशी संपर्क आलेला नाही. मालेगावहून परतल्यानंतर संबंधितांचे भुजबळ नॉलेज सिटीत विलगीकरण करण्यात आले होते. यामुळे वेगवेगळ्या भागात वास्तव्यास असणाऱ्या या पोलिसांच्या निवासस्थानाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर न करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. दुसरीकडे, डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत व्यक्तीचा काठेगल्लीतील निवासस्थान परिसर आणि मालेगाव येथे रुग्णसेवेची जबाबदारी सांभाळून परतलेल्या इंदिरानगर येथील परिचारिकेची इमारत या दोन नव्या प्रतिबंधित क्षेत्राची भर पडली. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या २९ वर पोहोचली आहे.

शहरात वेगवेगळ्या कारणांनी करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मालेगाव तसेच इतर भागात सेवा देणारे, करोनाबाधित क्षेत्रातून आलेले आणि संबंधितांच्या संपर्कात आलेल्यांचा बाधितांमध्ये समावेश आहे. नव्याने प्राप्त झालेल्या अहवालात मालेगाव येथे सेवा देणारे आणि येथे वास्तव्यास असणाऱ्या जवळपास १५ पोलिसांना करोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. हे कर्मचारी आडगाव पोलीस मुख्यालय, जेलरोड, अशोका मार्ग, रासबिहारी शाळा, कामटवाडा, पंचवटी, धात्रक फाटा, लोखंडे मळा, पाथर्डी फाटा, हनुमाननगर अशा विविध भागात वास्तव्यास आहेत.

करोनाबाधित रुग्णाच्या निवासस्थानाभोवतीचा ३०० ते ५०० मीटरचा परिसर प्रतिबंधित केला जातो. परंतु, हा निकष उपरोक्त पोलिसांच्या निवासस्थानासाठी लावला जाणार नाही. हे कर्मचारी महिन्यापासून मालेगाव येथे कार्यरत होते. तेथून परतल्यानंतर आडगावच्या भुजबळ नॉलेज सिटीत त्यांचे विलगीकरण करण्यात आले. या काळात त्यांचा घर, कुटुंबियांशी प्रत्यक्ष संपर्क झालेला नाही. यामुळे त्यांच्या निवासस्थानाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र केला जाणार नसल्याचे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंखे यांनी सांगितले.

इंदिरानगर पोलीस ठाण्यालगतच्या इमारतीत वास्तव्यास असणाऱ्या परिचारिकेचा अहवाल सकारात्मक आला. ती देखील मालेगाव येथे कार्यरत होती. करोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी तिने सर्व प्रकारची काळजी घेतली होती. संपर्क टाळला होता.

यामुळे संबंधित रुग्ण महिला ज्या इमारतीत वास्तव्यास आहे, केवळ तीच इमारत प्रतिबंधित क्षेत्र केले जाणार असल्याचे डॉ. साळुंखे यांनी सूचित केले. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आला. संबंधित रुग्ण काठेगल्लीत त्रिकोणी गार्डनच्या मागील बाजूला वास्तव्यास आहे. हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे

प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या २९ वर

डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयातील सुरक्षारक्षक आणि मालेगाव येथे रुग्णसेवेची जबाबदारी सांभाळून परतलेली परिचारिका या दोन रुग्णांच्या निवासस्थानाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. यामुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या २९ वर पोहचली आहे. नव्याने प्रतिबंधित झालेल्या क्षेत्रात काठेगल्लीतील त्रिकोणी गार्डनच्या मागील भाग आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यालगतची इमारत यांचा समावेश आहे. याआधी सिन्नरफाटा, धात्रक फाटा येथील हरिदर्शन, सागर व्हिलेज हे क्षेत्र, कोणार्कनगर दोन, इंदिरानगर, हिरावाडी, तारवालानगर, माणेकशानगर, समतानगर, पाटीलनगर, हिरावाडी, जाधव संकुल, उत्तमनगर, सावतानगर, म्हसरूळ, पाटीलनगर, श्रीकृष्ण कॉलनी हे क्षेत्र प्रतिबंधित झाले आहेत.