भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा आरोप

आरोग्य विद्यापीठाचे विभाजन, वीज दरातील तफावतीमुळे उद्भवलेले प्रश्न अशा कोणत्याही विषयात नाशिककरांवर अन्याय होऊ दिला जाणार नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. मंगळवारी भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते डॉ. डी. एस. आहेर यांच्या कुटुंबीयांची दानवे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आरोग्य विद्यापीठाच्या विभाजनाचा कोणताही निर्णय अद्याप झाला नसल्याचा दावा त्यांनी केला. आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांसाठी भरीव निधी शासन उपलब्ध करून देते. तथापि, दर्जेदार शिक्षण व सोयीसुविधा विद्यार्थ्यांना न मिळण्यास अधिकारी वर्ग जबाबदार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.

राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. आहेर यांच्या प्रयत्नांनी नाशिकमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापन झाले. विद्यापीठ दिवसागणीक सक्षम होत असताना त्याच्या विभाजनाचा मुद्दा पुढे आला आहे. या संदर्भात बोलताना दानवे यांनी आयुष मंत्रालयाने आयुष विद्यापीठाच्या स्थापनेसाठी चार जणांची समिती स्थापन केल्याचे मान्य केले. ते विद्यापीठ नागपूरला स्थापन करण्याच्या हालचालींनी वेग पकडला आहे. या मुद्दय़ावर आरोग्य विद्यापीठाचे विभाजन करण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतला नसल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. विदर्भ व मराठवाडय़ाच्या तुलनेत नाशिकमध्ये विजेचे दर अधिक आहेत. खासगी उद्योजकांना लाभ मिळावा, यासाठी एकलहरे औष्णिक वीज केंद्रात नवीन संच बसविण्याचे कामही रखडले आहेत. नाशिकचे पाणी मराठवाडय़ाला पळवून नेले जात आहे. वेगवेगळ्या माध्यमातून नाशिक अडचणीत आल्याच्या प्रश्नावर त्यांनी असे आरोप व चर्चामध्ये काही तथ्य नसल्याचे नमूद केले. आदिवासी विद्यार्थ्यांना राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या दर्जेदार शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी २५ हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरून शासनाने त्यांची व्यवस्था उपरोक्त शाळांमध्ये केली आहे. दरवर्षी शासन मोठा निधी आदिवासी विकास विभागाला देते. तथापि, आश्रमशाळा व वसतिगृहातील सोयीसुविधांबाबत तक्रारी होतात. नियोजन करण्याची जबाबदारी अधिकारी वर्गाची असते. त्यामुळे या त्रुटींना अधिकारी जबाबदार असल्याचे त्यांनी नमूद केले.

२०१४-१५ या वर्षांत पक्षाने संघटन वर्ष म्हणून जाहीर केले. त्यात पक्षाने एक कोटी पाच लाख सदस्य, भ्रमणध्वनीवर मिस्ड कॉल देऊन सभासद झालेल्यांसाठी महासंपर्क अभियान राबविले. राज्यात ७०० प्रशिक्षण शिबिरे घेऊन एक लाख कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले. संघटनात्मक निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्या. सदस्यता नोंदणी अभियानाद्वारे भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. संघटनात्मक बांधणीद्वारे भाजपने महापालिकेसह जिल्हा परिषद व इतर निवडणुकांची तयारी वर्षभराआधीच सुरू केल्याचे दानवे यांनी नमूद केले.

‘एक व्यक्ती, एक पद’ आमदारांना लागू नाही

आमदार वा खासदारांना संघटनात्मक पदे देऊ नये असे पक्षाच्या घटनेत म्हटलेले नाही. ‘एक व्यक्ती, एक पद’ हा निकष आमदारांना लागू नाही. आपण खासदार असूनही प्रदेशाध्यक्षपद भूषवीत आहोत. या पदावर निवड झाल्यावर केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा आपण दिला होता. स्थानिक कार्यकर्त्यांनी एकमताने जे नाव सुचविले, त्यावर शिक्कामोर्तब केले जाते. राज्यात अनेक ठिकाणी आमदारांना शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नाशिक शहरातील कार्यकर्त्यांनी शहराध्यक्षपदासाठी आ. बाळासाहेब सानप यांचे नाव सुचविले. त्यानुसार ही निवड झाल्याचे सांगत दानवे यांनी सानप यांच्या निवडीचे समर्थन केले.