‘मौखिक आरोग्य तपासणी’ कार्यक्रमातून माहिती उघडकीस

आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘मौखिक आरोग्य तपासणी’ उपक्रमात राज्यात नाशिक जिल्हा अव्वल  ठरला असताना, दुसरीकडे जिल्ह्य़ात ‘तंबाखुमुक्त शाळा’ उपक्रमाचा फज्जा उडाल्याचे उघड  झाले आहे.

ग्रामीण तसेच झोपडपट्टी परिसरात अल्पवयीन मुला-मुलींमध्ये तंबाखू खाण्याचे प्रमाण वाढले आहे. शालेय विद्यार्थ्यांची तपासणी झाली नसली तरी शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूचे सेवन वाढण्यास शिक्षक, पालक आणि सभोवतालची स्थिती हातभार लावत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय पथकांनी नोंदविले आहे. या पाश्र्वभूमीवर, काही सामाजिक संस्थांच्या मदतीने शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा शासकीय रुग्णालय आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाने एक ते ३१ डिसेंबर या कालावधीत शहर तसेच ग्रामीण भागात ‘मौखिक आरोग्य तपासणी’ कार्यक्रम झाला. याअंतर्गत ३० वर्षांपुढील सर्वाची तपासणी करण्यात आली.

संबंधित यंत्रणेने तब्बल २५ लाख ८४ हजार ८२३ नागरिकांची तपासणी केली. यासाठी यंत्रणेला आशा, अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांचे साहाय्य मिळाले. ग्रामीण तसेच झोपडपट्टी परिसरात पालकच घरी तंबाखू किंवा तत्सम पदार्थाचे सेवन करत असल्याने लहान मुलेही त्या गोष्टीचे अनुकरण करत असल्याचे निष्पन्न झाले. काही ठिकाणी शाळेच्या १०० मीटर परिसरात तंबाखुजन्य पदार्थाची खुलेआम विक्री होत असल्याने विद्यार्थी त्याच्या आहारी गेल्याचे निरीक्षण आहे. शिक्षकही शाळा परिसरात सर्रास तंबाखू सेवन करतात. बालके तसेच किशोरवयीन मुले त्यांचे अनुकरण करत आहेत.

अशा स्थितीत शालेय विद्यार्थ्यांना विविध व्याधींना तोंड द्यावे लागत आहे. या घटकांचा कुठेही  विचार झालेला नाही. दुसरीकडे, शालेय स्तरावर राबविण्यात येणारा ‘तंबाखुमुक्त शाळा’ उपक्रमाचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. याबाबत संबंधित यंत्रणेने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

या संदर्भात काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून मुलांना व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत प्रबोधन केले जात आहे.

तंबाखुमुक्तीविषयी प्रबोधन

जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्यावतीने संपूर्ण जिल्ह्य़ात मौखिक आरोग्य तपासणी उपक्रमात शालेय विद्यार्थी तंबाखू सेवन करीत असल्याचे आढळले. या विषयी प्रबोधन करण्यासाठी  ‘पीअर एज्युकेटर’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.  उपक्रम राबविला जाण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

-सी. आर. नामपूरकर, प्रकल्प समन्वयक

शालेय विद्यार्थ्यांसाठी लवकरच विशेष कार्यक्रम

किशोरवयीन मुला-मुलींची जिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी होत असते, परंतु शालेय विद्यार्थ्यांसाठी असा काही कार्यक्रम नाही. लवकरच जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य अधिकारी यांच्या सोबत चर्चा करत शालेय मुलांच्या मौखिक आरोग्याच्या दृष्टीने उपक्रम हाती घेण्यात येईल.

-डॉ. उदय बर्वे, मौखिक तपासणी समन्वयक,जिल्हा परिषद, आरोग्य विभाग