|| चारुशीला कुलकर्णी

शिक्षण, निवासाची जबाबदारी स्वीकारण्यास आदिवासी विकास विभाग अनुकूल

रमाबाई आंबेडकर वसतिगृहाच्या नूतनीकरणासाठी विद्यार्थिनींचे अन्य ठिकाणी स्थलांतर झाले. वसतिगृह स्थलांतरामुळे या ठिकाणी असलेल्या पेठ, सुरगाणा तालुक्यातून आलेल्या आदिवासी खेळाडू विद्यार्थिंनीच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला. नाशिक जिल्हा खो-खो संघटनेच्या पाठपुराव्यानंतर आदिवासी विकास विभागाने या विद्यार्थिनींची शिक्षण आणि निवासाची जबाबदारी स्वीकारण्यास अनुकूलता दर्शविली आहे. या खेळाडूंना आदिवासी क्रीडा प्रबोधिनीत वास्तव्य करता येईल. महत्त्वाची बाब म्हणजे, आजवर मुलींपुरताच मर्यादित राहिलेल्या प्रबोधिनीचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठीही खुले होण्याच्या मार्गावर आहेत.

शालिमार परिसरातील रमाबाई आंबेडकर वसतिगृहाचे नूतनीकरण सुरू असल्याने सध्या वसतिगृहातील २०० विद्यार्थिनींना जळक्या वाडय़ात स्थलांतरित करण्यात आले आहे. तिथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जागेअभावी वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी खेळाडू विद्यार्थिनींना अन्य ठिकाणी व्यवस्था पाहावी, अशी सूचना वसतिगृह पदाधिकाऱ्यांनी केली होती. उन्हाळ्याच्या सुटीनंतर आदिवासी विद्यार्थिनी पुन्हा नाशिक येथे परतल्यावर त्यांचे शिक्षण, रहाण्याची व्यवस्था काय, यावर नाशिक जिल्हा खो-खो संघटनेने विचारमंथन सुरू केले. संघटनेने आदिवासी विकास विभागाशी संपर्क साधत वसतिगृहातील २० खेळाडूंसह अन्य सात खेळाडू अशा २७ विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था आदिवासी क्रीडा प्रबोधिनीत करावी, अशी विनंती केली. या अनुषंगाने विद्यार्थिनींशी संबंधित कागदपत्रे, खेळातील गुणवत्ता प्रमाणपत्रे, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर त्यांनी मिळविलेले यश याची माहिती सादर करण्यात आली. सद्यस्थितीत आदिवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये अ‍ॅथेलेटिक्स, खो-खो आणि कबड्डीच्या खेळाडुंची राहण्याची व्यवस्था आहे. आधी २० विद्यार्थिनी होत्या. नव्याने सात विद्यार्थिनी येत असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस मंदार देशमुख यांनी दिली.

विद्यार्थिनींच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यास आदिवासी विकास विभागाने अनुकूलता दर्शविली असून मुलींचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्या विद्यालयात घेण्यात आला आहे. सहावी ते नववीच्या या विद्यार्थिनी असून राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर त्यांनी खो-खोमध्ये उल्लेखनिय कामगिरी केली असल्याचे देशमुख यांनी सांगितले. आदिवासी भागातून आलेल्या मुलींची चमकदार कामगिरी पाहता मुलेही खेळात पुढे येत आहेत. त्यांचे शिक्षण तसेच खेळविषयक प्रशिक्षणासाठी संघटना प्रयत्न करत आहे. २७ विद्यार्थिनींसह १२ विद्यार्थ्यांचा प्रस्ताव आदिवासी विभागाकडे देण्यात आला आहे.