मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेतर्फे श्रद्धांजली सभेचे आयोजन

नाशिक : आयुष्यभर वनात रमणारे आणि वनात राबणाऱ्यांसोबत अतूट नाते जपणाऱ्या विनायकदादांनी ग्रामीण, आदिवासी भागातील जनतेला स्वत:च्या पायावर उभे केले. बायफ संस्थेच्या माध्यमातून आंबा, काजू लागवडीला प्रोत्साहन देऊन सामान्य, अडाणी माणसाला पाठबळ दिल्याची भावना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मांडली. राजकारण, सहकार, साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक अशा सर्व क्षेत्रांत आपल्या कामगिरीचा ठसा उमटविणारे चतुरस्र व्यक्तिमत्त्व माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांना सोमवारी मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विविध क्षेत्रांत कार्यरत राहिलेल्या विनायकदादांच्या आठवणींना उपस्थितांनी उजाळा दिला.

गंगापूर रस्त्यावरील उदोजी मराठा बोर्डिग येथे ही सभा झाली. विनायकदादा मविप्र संस्थेशी जोडलेले होते. काही वर्षांपूर्वी मविप्र संस्थेने नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वीपणे आयोजन के ले. संमेलनाच्या नियोजनात विनायकदादांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. संस्थेचा शतक महोत्सव यशस्वी करण्यात दादांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. दादांच्या निधनामुळे मविप्र समाज संस्था पोरकी झाल्याची भावना सरचिटणीस नीलिमा पवार यांनी व्यक्त केली. आयुष्यभर शब्दांचा जागर करणारे, बहुजन समाजातील महिलेला सन्मान शिकविणारे दादा हे सर्वासाठी उत्तम मार्गदर्शक होते, असे त्यांनी नमूद केले. खासदार भारती पवार यांनी दादा म्हणजे प्रश्नांची सोडवणूक करणारे व्यक्तिमत्त्व होते, असे सांगितले. आमदार दिलीप बनकर यांनी दादांकडे सर्व क्षेत्रांतील दूरदृष्टी होती, त्यामुळे जिल्ह्य़ाच्या विकासकार्यात त्यांचे योगदान राहिल्याचे नमूद केले. आमदार सुधीर तांबे यांनी यशवंतराव चव्हाण यांची आठवण करून देणारे अधिकारवाणीने बोलणारे, ज्ञानदान करणारे व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली. डॉ. तुषार शेवाळे यांनी समाजकारण, राजकारणाची दिशा देणारे दादा मार्गदर्शक होते, असे सांगितले. शशिकांत शिंदे यांनी जिव्हाळ्याचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त के ली.

प्रत्येक क्षेत्रात वावरणाऱ्या विनायकदादांनी नाशिककरांना कायम आनंदाचे क्षण दिले. कलाकाराला ते मनापासून दाद आणि प्रोत्साहन देत असल्याची आठवण अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी मांडली. विनायकदादांनी स्वत:पेक्षा समाजहिताला नेहमी प्राधान्य दिल्याचे नमूद केले. समाजप्रबोधन करणारे ते व्यक्तिमत्त्व होते, असे नगरसेवक गुरूमित बग्गा यांनी सांगितले. माजी मंत्री शोभा बच्छाव यांनी प्रत्येकाला आपलेसे वाटणारे, कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणाऱ्या दादांच्या जाण्याने नाशिक जिल्हा, महाराष्ट्र त्यांच्या मार्गदर्शनाला मुकला असल्याचे सांगितले. या वेळी सीमा हिरे, सरोज अहिरे, हिरामण खोसकर या आमदारांसह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, सदस्य अमृता पवार, मविप्रचे सभापती माणिकराव बोरस्ते आदी उपस्थित होते.