समाजकंटकांच्या कृत्यामुळे शेतक ऱ्यांचे नुकसान

कांद्याचे वाढणारे दर एकीकडे शेतकऱ्यांना समाधान देत असतानाच आता ज्यांच्याकडे कांदा आहे, त्यांचे नुकसान करण्याचे प्रकार घडू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. तालुक्यातील भऊर येथे काही समाजकंटकांनी साठवणूक केलेल्या कांदा चाळीत युरिया टाकल्याने शेतकरी विष्णू आहेर यांचे सुमारे साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले.

कांदा उत्पादकांना मागील वर्षी झालेल्या विक्रीतून उत्पादन खर्चही निघाला नव्हता. या वर्षी कांद्याला नुकताच चांगला भाव मिळण्यास सुरुवात झाली होती. त्यातच अशा प्रकारची घटना तालुक्यात घडल्याने कांदा उत्पादकांकडून अशा समाजकंटकांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. उन्हाळी कांदा साठवणुकीसाठी आहेर यांनी राहत्या घरासमोर चाळ बांधली आहे. साठवलेला कांदा सडत असल्याचे आहेर यांच्या लक्षात आले. खराब वातावरणामुळे सर्वत्र कांदा खराब होत असल्याने आपलाही कांदा खराब होत असेल, असा त्यांचा समज झाला. खराब कांदा चाळीबाहेर काढण्यास सुरुवात केली असता कोणी तरी चाळीतील कांद्यावर युरिया टाकल्याचे त्यांच्या लक्षात आले. १२०क्विंटल कांदा खराब झाल्याने आहेर यांचे आजच्या बाजारभावाने सुमारे साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले.

दुष्काळी परिस्थितीला तोंड देऊन पाण्याचे काटेकोर नियोजन करीत कांदा पिकाचे उत्पादन घेतले होते. कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळायला लागताच कोणी तरी  माझ्या कांदा चाळीत रासायनिक खत युरिया टाकल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे – विष्णू आहेर  (शेतकरी)