उमेदवारांच्या मनात आशा-निराशेचे हेलकावे, दहा मतदारसंघांत मतदानाची टक्केवारी घटली 

जिल्ह्य़ात शहरी आणि ग्रामीण भागातील १० मतदारसंघांत घटलेले मतदान कोणाला तारक वा मारक ठरणार, याबद्दल तर्कवितर्क सुरू झाले आहेत. बंडखोरी, ऐन वेळच्या पक्षांतरामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली. चुरशीच्या लढतीत विद्यमान राज्यमंत्री दादा भुसे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांसह विद्यमान आमदारांना आपले गड राखता येतील की नाही, याविषयी निकाल हाती येईपर्यंत खलबते रंगणार आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा शहरी आणि काही ग्रामीण अशा एकूण १० मतदारसंघांतील मतदानात एक ते आठ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. सेना बंडखोरामुळे चर्चेत आलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघात सेना-भाजपमध्ये वितुष्ट निर्माण झाले. या ठिकाणी भाजपच्या आमदार सीमा हिरे आणि राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे यांच्यात लढत होणार आहे. मागील निवडणुकीत सेना स्वतंत्रपणे लढली होती. यंदा विलास शिंदे यांनी बंडखोरी केली.  नाशिक पूर्वमध्ये दोन आयारामांची लढत रंगतदार ठरली. राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप आणि भाजपच्या राहुल ढिकले यांच्यात कोण बाजी मारणार, याची उत्सुकता आहे. विद्यमान आमदारास तिकीट नाकारण्याचा पालकमंत्री गिरीश महाजनांचा निर्णय होता. यामुळे भाजपने ही जागा प्रतिष्ठेची केली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभा घेतली. या निकालावर महापालिकेतील पुढील रणनीती ठरणार आहे. सानप यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई असून सानपांमुळे पालिकेतील राजकारणाला धक्का बसू नये, असा भाजपचा प्रयत्न आहे. नाशिक मध्य मतदारसंघात भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि मनसेचे नितीन भोसले यांच्यात सरळ लढत झाली. येथे गेल्या वेळच्या तुलनेत तीन टक्क्यांनी मतदान कमी झाले आहे. देवळालीत तीन दशकांपासून असणारे घोलप कुटुंबीयांचे वर्चस्व आगामी काळात राहील की नाही, याचा फैसला निकालातून होईल. शिवसेनेचे योगेश घोलप आणि राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांच्यातील लढतीकडे सर्वाचे लक्ष आहे. येवला मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून येणाऱ्या छगन भुजबळांसमोर महायुतीचे संभाजी पवार यांनी आव्हान निर्माण केले आहे. राजकीय भवितव्यासाठी भुजबळांना ही निवडणूक महत्त्वाची आहे. शिवसेनेने चांगलाच जोर लावल्याने ही लढत चुरशीची ठरली आहे. तशीच स्थिती नांदगावमध्ये आहे. भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांच्यातील निकाल भाजप बंडखोर किती आणि कोणाचे मतदान घेईल, यावर अवलंबून आहे.

गेल्या वेळच्या तुलनेत या मतदारसंघात आठ टक्क्यांनी मतदान घटले. कधीकाळी भुजबळ, कांदे एकत्र होते. भुजबळांच्या प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली होती. सेनेत गेल्यानंतर कांदेंनी त्यांना आव्हान दिले. पक्षांतर करून निर्मला गावित या सलग तिसऱ्यांदा इगतपुरीत आमदारकी मिळविण्यात यशस्वी होतील की नाही, हे ठरणार आहे. ही निवडणूक त्यांना सहज नसल्याचे काँग्रेसच्या हिरामण खोसकर यांनी प्रचारात दाखविले. मालेगाव बाह्य़मधील शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे आणि काँग्रेसचे डॉ. तुषार शेवाळे तसेच मालेगाव मध्य मतदारसंघात काँग्रेसचे आसिफ शेख आणि एमआयएमचे मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्यात अटीतटीची लढाई आहे. सिन्नरमध्ये मतदानात सात टक्क्यांनी घट झाली. त्याचा फटका कोणाला बसणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे आणि सर्व पक्ष फिरून आलेले राष्ट्रवादीचे माणिक कोकाटे यांच्यात सरळ सामना आहे. निफाडमध्ये सेनेचे आमदार अनिल कदम यांच्यासमोर राष्ट्रवादीचे दिलीप बनकर, चांदवडमध्ये भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर विरुद्ध काँग्रेसचे शिरीष कोतवाल, बागलाणमध्ये राष्ट्रवादीच्या आमदार दीपिका चव्हाण विरुद्ध भाजपचे दिलीप बोरसे, कळवणमध्ये राष्ट्रवादीचे नितीन पवार विरुद्ध शिवसेनेचे मोहन गांगुर्डे, दिंडोरीत राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ विरुद्ध सेनेचे भास्कर गावित या लढती अंतिम चरणात कमालीच्या चुरशीच्या झाल्या आहेत. कळवणचे माकपचे आमदार जिवा पांडू गावित यांच्यासमोर अस्तित्वाची लढाई आहे. बंडखोरी वा ऐन वेळी पक्षांतर करणाऱ्यांची ताकद निकालातून लक्षात येईल.