दहा दिवसांआड पाणी मिळणार, सध्या १२ ते १४ दिवसांआड पाणी, नागरिकांना दिलासा 

यंदा अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण तीन वर्षांनंतर प्रथमच संपूर्ण भरून वाहू लागले. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण तुडुंब होण्यास मदत झाली. त्यामुळे दिवाळीत मनमाडकरांना १० दिवसांआड पाणी मिळू शकणार आहे.

तीन वर्षांनंतर प्रथमच धरणाची पातळी ७१ फुटांपर्यंत गेली. धरणातून पाणी ओसंडून वाहू लागल्याची माहिती मिळाल्यावर महिला वर्गात आनंदाचे वातावरण पसरले. अनेकांनी धरणाकडे धाव घेतली. धरणात ११० दशलक्ष घनफुट पाणीसाठा झाला आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याचा शेवट होत असताना धरण भरल्याने शहराला सध्याच्या पुरवठा व्यवस्थेत धरणातील पाणी आठ महिने पुरू शकते.  सध्या शहराला भर पावसाळ्यातही १२ ते १४ दिवसांआड एक वेळ तेही एक तास नगरपालिकेमार्फत नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाण्याचे महत्त्व जाणणाऱ्या मनमाडकरांना वाघदर्डी धरण भरल्याचा विशेष आनंद आहे. टंचाईने त्रस्त झालेल्या सुमारे सव्वा लाख नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पाणीटंचाई आणि मनमाड हे समीकरण दर वर्षी कायम असते. यंदादेखील उन्हाळ्यात तब्बल ३२ दिवस शहराला पाणीपुरवठा झाला नव्हता. धरण कोरडे असल्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली. यंदा मात्र वरुणराजाची कृपा झाली. पालखेड धरणातून मिळालेले पूर पाण्याचे आवर्तन आणि परतीचा पाऊस यामुळे वाघदर्डी धरण भरले आहे. धरण भरल्याने गुरुवारी सकाळी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी वाघदर्डी धरणावर जाऊन विधिवत पूजन केले.  या धरणाची स्थापना १९६६ ते १९७१ दरम्यान झाली असून केवळ माती आणि दगडाचा बांध टाकून हे धरण बांधण्यात आले आहे.

धरणाची मूळची पाणी साठवणक्षमता ९० दल घनफूट एवढीच आहे. मध्यंतरी नगर परिषदेने त्यातील गाळ उपसा करून आजूबाजूने क्षमता वाढविली. सध्याची धरणाची क्षमता ११० दलघन फूट इतकी आहे. परंतु, धरणाच्या पातळीनुसार ६८.९ दशलक्ष घनफुटांवर धरण भरते. धरणाच्या सांडव्यावर फळ्या लावल्यास धरणातील पाण्यावर दाब वाढून धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते धोकादायक ठरू शकते. परिणामी  धरणाच्या मागच्या बाजूने पाणी थेट वाघदर्डी गावात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाघदर्डी धरणाच्या सांडव्यावर फळ्या लावण्यात येणार नसल्याचे पालिकेने नमूद केले आहे. धरणाच्या जलपूजनप्रसंगी पाणीपुरवठा अभियंता अमृत काजवे, लेखा विभागाचे आनंद औटी, मुख्तार शेख आदी कर्मचारी उपस्थित होते.

वाघदर्डी धरणातील पाणी पाटोदा साठवणूक तलावात भरून घेण्यात आले आहे. परतीच्या पावसाने अखेर मनमाडकरांना साथ दिली. हे पाणी पुढील आठ महिने पुरेल. दिवाळीत आता १० दिवसांआड पाणीपुरवठा करू शकतो. -डॉ. दिलीप मेनकर (मुख्याधिकारी, पालिका)