गंगापूर ८० टक्के भरल्यास विसर्ग; शहरातील पाणी पुरवठा आज बंद

नाशिक : गंगापूर धरणातील जलसाठा ७२ टक्के आणि या समुहातील जलसाठा ६० टक्क्यांवर गेला असला तरी पावसाची उघडीप बघता शहरातील पाणी कपात या आठवडय़ात तरी कायम राहणार आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने जलसाठा उंचावण्याची गती संथ झाली आहे. गंगापूरमध्ये ८० ते ८५ टक्के जलसाठा झाल्याशिवाय विसर्गही केला जाणार नाही. मागील आठवडय़ात गुरूवारी झालेली कपात या आठवडय़ापासून बुधवारी होणार आहे. या दिवशी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहील.

जवळपास दीड महिना पावसाने काही तालुक्यांचा अपवाद वगळता बहुतांश भागाकडे पाठ फिरवली होती. धरणांची पातळी कमी झाल्याने महापालिकेला ऐन पावसाळ्यात कपातीचा निर्णय घेण्याची वेळ आली. त्यानुसार गेल्या आठवडय़ापासून कपातीला सुरूवात झाली. याच सुमारास त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळू लागला. त्याचा लाभ गंगापूर आणि समुहातील धरणातील जलसाठा उंचावण्यात झाला. गंगापूर निम्मे भरल्याने पाणी टंचाईचे संकट दूर झाल्याची भावना उमटली. कपातीचा निर्णय मागे घेतला जाईल, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली. मात्र, त्यास पालकमंत्री छगन भुजबळ यांनी चाप लावला. गंगापूरमधील जलसाठा उंचावला असला तरी समुहातील स्थिती समाधानकारक नाही. त्यामुळे लगेच कपात मागे घेतली जाणार नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले होते.

जलसाठा काहिसा उंचावला असला तरी सलग दुसऱ्या आठवडय़ात म्हणजे बुधवारी शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारी गंगापूर धरणात चार हजार ३९ दशलक्ष घनफूट म्हणजे ७२ टक्के जलसाठा झाला आहे. या समुहातील काश्यपीत ७०३ (३८), गौतमी गोदावरी ८२८ (४४) आणि आळंदी धरणात ४७० (५८) जलसाठा आहे. गंगापूर धरण समुहाची एकूण १० हजार १६६ दशलक्ष घनफूट क्षमता आहे. त्यात सध्या सहा हजार ४० दशलक्ष घनफूट म्हणजे ५९ टक्के साठा आहे. सर्वसाधारणपणे धरणांच्या जलसाठय़ाच्या वेळापत्रकानुसार ऑगस्टच्या मध्यापर्यंत धरणात ८० ते ८५ टक्के जलसाठा केला जातो. त्याचा विचार करता गंगापूर धरणात अद्याप तेवढा जलसाठा झालेला नाही. ही पातळी गाठल्यानंतर धरणातून पाणी सोडण्याचा विचार केला जाईल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. पावसाने विश्रांती घेतल्याने गंगापूरमध्ये येणाऱ्या पाण्याचा प्रवाह (येवा) ओसरला आहे. पुढील काळात चांगला पाऊस झाल्यास आणि धरणाचे दरवाजे उघडल्यास शहरातील कपात रद्द करणेही क्रमप्राप्त ठरणार आहे.