नाशिक : अयोध्येत बुधवारी होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी गोदावरीचे जल आणि कपिला संगम, तपोवनातील माती सोमवारी पाठविण्यात आली. मंदिर निर्माण कार्यक्रमात त्याचा वापर केला जाईल, असे महंत भक्तीचरणदास महाराज यांनी सांगितले. शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे उपरोक्त दिवशी कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करणार नसल्याचे विश्व हिंदू परिषदेच्या स्थानिक शाखेने म्हटले आहे.

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यास २०० निमंत्रित मान्यवर उपस्थित असतील.

करोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या सोहळ्यात अनेक पातळीवर खबरदारी घेतली जात आहे. भूमिपूजनाच्या निमित्ताने नाशिकची माती आणि गोदावरीचे जल भारत सेवा संघाचे परिपूर्णानंद महाराज घेऊन रवाना होत असल्याचे भक्तीचरणदास महाराज यांनी सांगितले.

खासगी वाहनाने महंत अयोध्येला रवाना झाले. दोन दिवसांत कदाचित ते अयोध्येत पोहोचतील. वेळेत ते पोहोचू शकले नाहीत तर मंदिराच्या उभारणीत त्याचा वापर केला जाईल, असे भक्तीचरणदास महाराज यांनी सांगितले. यावेळी महंत सुधीरदास, बैजीनाथ महाराज, दीपक बैरागी आदी उपस्थित होते.

दरम्यान, विश्व हिंदू परिषदेच्या नाशिक शाखेने त्र्यंबकेश्वर आणि नाशिकहून गोदावरीचे जल आणि माती अयोध्येला पाठविली असल्याचे परिषदेचे प्रमुख पदाधिकारी गणेश सपकाळ यांनी सांगितले. अयोध्येतील सोहळ्यास उपस्थित राहण्याची प्रत्येकाला इच्छा आहे. परंतु, करोनाच्या पार्श्वभूमीवर ते अशक्य आहे.

नाशिक शहरात करोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. यामुळे बुधवारी शहरात गर्दी होईल असा कोणताही कार्यक्रम केला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.