बागलाण तालुक्यात पाणीबाणी

बागलाण तालुक्यात उष्णतेच्या लाटेत तालुकावासीयांना अभूतपूर्व टंचाईला तोंड द्यावे लागत असून एप्रिलच्या अखेरीस तालुक्यातील टँकरच्या संख्येने पन्नाशी पार केली आहे. यामुळे या वर्षी तालुक्यात पाणीबाणी निर्माण झाल्याचे चित्र आहे. तालुक्यातील ४० गावांमध्ये ३४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मोसम, आराम नदीवरील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी देखील कोरडय़ाठाक झाल्याने टँकरग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. दुसरीकडे हातावर पोट भरणाऱ्या मजुरांना रणरणत्या उन्हात जगण्याचा संघर्ष करावा लागत आहे.

बागलाण तालुक्यात यंदा अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न असलेल्या बागलाण तालुक्यात त्याचा ऱ्हास झाल्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाला तोंड देताना नागरिकांच्या नाकीनऊ  आले असून तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात टंचाई जाणवत आहे. सटाणा शहराच्या इतिहासात प्रथमच महिन्यानंतर नळांना पाणी आले. ग्रामीण भागातही हेच चित्र असून तालुक्यातील टँकरची मागणी वाढत आहे. सद्य:स्थितीत तालुक्यात ४७ गावे आणि चार वाडय़ांना टँकरची गरज असून पैकी ४० गावांना सध्या पाणीपुरवठा केला जात आहे. या आठवडय़ात आणखी सहा गावांनी टँकरची मागणी केली आहे. त्यापैकी नामपूर या सर्वाधिक मोठय़ा गावाकडूनही टँकरची मागणी आली असून येत्या दोन दिवसांत तिथे टँकरने पाणी दिले जाईल. तालुक्यातील १० गावांसाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून टँकर भरण्यासाठी चार विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. तालुक्यात २५ खासगी, तर नऊ  शासकीय टँकरद्वारे १०० फेऱ्या करून पाणीपुरवठा केला जात आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष अधिक वाढीस लागून टंचाईच्या झळा असह्य़ होऊन ग्रामस्थांकडून टँकरची मागणी केली जात आहे. या सप्ताहात टँकरच्या संख्येने ५० चा आकडा ओलांडला असून लवकरच टँकरची संख्या आणखी वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

काम नसल्याने मजूर सहज उपलब्ध

तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने सर्वच पिकांची लागवड अत्यल्प प्रमाणात झाली. त्यामुळे एरवी मजुरांसाठी धावपळ करणाऱ्या शेतकऱ्यांना सहजासहजी मजूर उपलब्ध होत आहेत. परंतु ४० अंशाचा टप्पा ओलांडणाऱ्या रणरणत्या उन्हात अक्षरश: जिवावर उदार होत मजूर वर्गाला दोन पैशांसाठी संघर्ष करावा लागत आहे. दुष्काळामुळे कामधंदा नसल्याने मिळेल ते काम करून दोन पैसे कमविण्यासाठी हातावर पोट असलेल्या वर्गाची प्रचंड कुचंबणा होताना दिसून येते.

पाणीपुरवठा योजनाही ठप्प

उन्हाच्या तडाख्यात टंचाई वाढीस लागल्याने गावोगावी पाण्यावरून संघर्षसुद्धा पाहायला मिळत आहे. मोसम आणि आरम नदी काठावरील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी कोरडय़ाठाक झाल्याने ५० हून अधिक योजना ठप्प झाल्या आहेत. या गावांना अखेरच्या आवर्तनानंतर काही प्रमाणात दिलासा मिळणार असला तरी आज त्यांना कपातीला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, या गावांकडून टँकरची मागणी होऊ  लागली आहे. नदी काठापासून लांब असलेल्या गावांना पावसाळ्यापर्यंत मरणयातना सहन कराव्या लागत असल्याचे भयावह चित्र आहे.