04 March 2021

News Flash

‘सर्जिकल स्ट्राइक’ म्हणजे काय?

पाकिस्तानच्या हद्दीतील नेमक्या कोणत्या तळांवर हल्ला करायचे

पाकिस्तानच्या हद्दीतील नेमक्या कोणत्या तळांवर हल्ला करायचे हे आदल्या दिवशी निश्चित झाल्यानंतर लष्कराच्या विशेष तुकडीने रंगीत तालीम केली. प्रत्येकाची जबाबदारी आधीपासून निश्चित असल्याने प्रत्यक्ष कार्यवाहीवेळी अंतर्गत समन्वयाचा फारसा प्रश्न नव्हता. लष्करी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नियंत्रण रेषेलगत उतरल्यानंतर तुकडीतील कमांडो अंधारात उपयुक्त ठरतील अशी उपकरणे आणि अत्याधुनिक आयुधे घेऊन नियंत्रण रेषा ओलांडत नकाशाच्या आधारे मार्गस्थ झाली. त्यानंतर एकापाठोपाठ लक्ष्य भेदण्यास सुरूवात झाली. अवघ्या काही तासात विद्युतगतीने सहा ते सात ठिकाणी अकस्मात नेमकी कारवाई झाल्यामुळे शत्रूच्या गोटात भंबेरी उडवत विशेष तुकडीतील ‘कमांडो’ दोन ते अडीच किलोमीटरचे अंतर पायी कापत पुन्हा भारतीय हद्दीत परतले..

पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराच्या विशेष तुकडीने केलेल्या धाडसी कारवाईचे हे स्वरुप याच तुकडीत कधीकाळी काम केलेल्या निवृत्त अधिकाऱ्यांनी कथन केले. एखाद्या विशिष्ट ठिकाणी नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाई म्हणजे ‘सर्जिकल स्ट्राईक’. आसपासच्या परिसरात इतर कोणतेही नुकसान होणार नाही, याची दक्षता घेऊन शत्रूची ठिकाणे जमीनदोस्त करण्यासाठी जगभरात अनेकदा हा पर्याय अवलंबला गेला आहे. भारतीय लष्कराने यापूर्वी इतरत्र त्याचा वापर केला होता. पाकिस्तानविरोधात प्रथमच अशी कारवाई झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. भारतीय लष्कराच्या शस्त्रदलात अनेक विभागांचा समावेश आहे. पायदळ व चिलखती हे दल प्रत्यक्ष शत्रुशी लढा देत असले तरी उर्वरीत विभाग त्यांना सहाय्यकारी भूमिकेत असतात. अर्थात, शत्रुला धोबीपछाड देण्याकामी या सर्वाची सामूहिक कार्यवाही महत्वपूर्ण ठरते. मर्यादित वा र्सवकष युध्दात हे सर्व दल एकत्रित काम करतात. तथापि, विशेष तुकडीचे काम त्यापेक्षा वेगळे असते.

सर्वसाधारणपणे लष्करी तुकडीत ‘घातक’ या नावाचा काही अधिकारी व जवानांचा समूह असतो. तो इतरांपेक्षा वेगळी क्षमता राखून असतो. शारीरिक व मानसिकदृष्टय़ा भक्कम, विविध आयुधे चालविण्यात प्रवीण, पर्वतारोहण अथवा जंगलात कित्येक किलोमीटरची पायपीट करण्याची धमक, आयुध नसताना दोन हात करणे, अन्नाविना राहणे अशा नानाविध क्षमता राखणाऱ्याचे अष्टपैलूत्व लक्षात घेऊन त्यांना ‘पॅरा कमांडो’ अथवा विशेष तुकडीत स्थान दिले जाते. तुकडीतील कमांडोंची संख्या अतिशय मर्यादित असल्याने प्रत्येकाला आपली जबाबदारी माहीत असते. म्हणजे, त्यांना आपसात समन्वयाची गरजही भासत नाही. विशेष तुकडीत निवडल्या जाणाऱ्या तरूण अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण वेगळे असते. चपळाईने आपले काम फत्ते करण्यासाठी जे काही आवश्यक आहे, त्या सर्व प्रकारचे प्रशिक्षण लष्कराच्या स्वतंत्र संस्थेमार्फत दिले जाते. हेलिकॉप्टरमधून शस्त्रास्त्रे पाठिशी बांधून उडी मारत पॅराशूटने जमिनीवर उतरणे आणि कारवाई करण्याचे कित्येक सराव त्यांच्यामार्फत करवून घेतले जातात. अद्ययावत हलक्या वजनाच्या आयुधांचा संबंधितांकडून प्रामुख्याने वापर केला जातो. त्यात अर्धस्वयंचलीत स्नायपर अथवा जर्मन बनावटीची कलाश्निकोव्ह रायफल, स्वयंचलीत ग्रेनाईट लॉँचर, वापरल्यानंतर निरुपयोगी ठरणारे रॉकेट लाँचर, अंधारात मार्गक्रमण करण्यासाठी खास दुर्बीण आदींचा त्यात समावेश असतो. प्रत्येकाकडे अनेकविध शस्त्र चालविण्याचे कसब असते.

‘पॅरा कमांडो’ तुकडीत निवडल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांना तुलनेत अधिक काळ काम करता येते. घातक दलातून विशेष दलात समाविष्ट झालेल्यांना तीन ते चार वर्षे काम करता येते. वयोमानपरत्वे कार्यक्षमतेवर परिणाम होऊ नये, म्हणून नंतर त्यांना मूळ तुकडीत पाठवले जाते. विशेष तुकडीतील जवानांची संख्या मर्यादित असल्याने संबंधितांना फार काळ सुटीही दिली जात नाही. लष्कराचे विशेष दल पॅराशूट बटालियन, नौदलाचे मार्कोव्ह्ज तर हवाई दलाचे गरुड म्हणून ओळखले जाते.

हल्ला केलेले तळ भिंबर

  • जम्मूच्या प्रदेशातील पाकव्याप्त काश्मीरमध्ये (आझाद काश्मीर) भिंबर नावाचा जिल्हा आहे. भिंबर हे जिल्ह्य़ाचे मुख्य ठिकाण असून ते नियंत्रण
  • रेषेजवळ वसले आहे. ते मीरपूरपासून ५० किलोमीटरवर, झेलमपासून ४८ किमीवर, इस्लामाबादपासून १६६ किमीवर आणि श्रीनगरपासून २४१ किमीवर आहे. (३२.५८५० अंश उत्तर अक्षांश, ७४.०४१० पूर्व रेखांश)
  • केल हे पाकव्याप्त काश्मीरच्या नीलम खोऱ्यातील नियंत्रण रेषेनजीकचे गाव आहे. ते मुझफ्फराबादपासून १५५ किमीवर आणि समुद्रसपाटीपासून २०९७ मीटरवर (६८७९ फूट) उंचीवर वसले आहे. (३४.५८९१ अंश उत्तर अक्षांश, ७३.९१०६ अंश पूर्व रेखांश)
  • लिपा हे पाकव्याप्त काश्मीरमधील लिपा खोऱ्यातील ठिकाण आहे. ते मुझफ्फराबादपासून १०५ किमी अंतरावर आहे. (३४.३१३६ अंश उत्तर अक्षांश, ७३.८९८१ अंश पूर्व रेखांश)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 2:00 am

Web Title: what is a surgical strike
Next Stories
1 ‘समृद्धी’त भाजपची कोंडी
2 निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपकडून महिलांचे सक्षमीकरण
3 वाघाचे बनावट कातडे विकण्याचा प्रयत्न
Just Now!
X