धुळे-सुरत-नागपूर महामार्गावरील अमळनेर चौफुलीजवळ आज भल्या पहाटे धावत्या ट्रकला अडवून ट्रक चालकावर चाकू, काठीने हल्ला चढवत लुटमार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ट्रक चालकांच्या धाडसामुळे लुटारुंचा डाव त्यांच्यावरच उलटला. यातील एक लुटारु पोलिसांच्या हाती लागला असून तीन जण पसार झाले आहेत. याप्रकरणी मुन्ना महेश्‍वरी या क्लिनरने धुळे तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

धुळे शहराजवळून जाणार्‍या सुरत-नागपूर महामार्गावरील फागणे गावाजवळ अमळनेर फाट्याजवळ आज (दि.११) पहाटे २.३० वाजेच्या सुमारास दोन मोटरसायकलवरुन आलेल्या चार तरुणांनी एक धावता ट्रक अडवला. यावेळी चौघांपैकी अमोल दिनकर हिवाळे (वय २७) हा ट्रकच्या कॅबिनमध्ये शिरला आणि चाकूचा धाक दाखवीत क्लिनर मुन्ना महेश्‍वरी आणि ट्रक चालक विरुभाई अहेजा यांना पैश्यांची मागणी करु लागला. त्यास क्लिनर आणि चालकाने विरोध केला असता त्यांच्यात झटापट सुरु झाली. त्यावेळी इतर तिघांनी देखील काठीच्या सहाय्याने या ट्रकमधील दोघांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोघांनी धाडसाने त्या लुटारुंचा सामना करीत कॅबिनमध्ये चढलेल्या अमोल हिवाळे यास धरुन ठेवले तर इतरांना ट्रक बाहेरच थोपवले. त्याचवेळी महामार्गावरील गस्ती पथक या ठिकाणी पोहचले. पोलिसांना पाहून तिघे जण मोटरसायकलवरुन पसार झाले. तर अमोल हिवाळे हा पोलिसांच्या हाती लागला.
 
दरम्यान, पोलिसांनी अमोल हिवाळेला ताब्यात घेत त्याच्याकडून इतर तिघांची माहिती मिळवली. याप्रकरणी ट्रक क्लिनर मुन्ना महेश्‍वरी याच्या फिर्यादीवरुन अमोल हिवाळे, चंदू पाजगे (जालना), सुनिल (औरगांबाद) आणि सोन्या (धुळे) या चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी अमोल हिवाळे याला अटक करण्यात आली असून इतर तीन जणांचा पोलीस तपास करत आहे.