ग्रामस्थ आक्रमक; दोषींना निलंबित करण्याची मागणी

नाशिक : सर्पदंश झालेल्या आदिवासी महिलेला वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसल्याने उपचाराअभावी प्राण गमवावे लागले. बागलाण तालुक्यातील अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. संतप्त ग्रामस्थांनी केंद्राच्या आवारात मृतदेह ठेवून दोषींना निलंबित करण्याची मागणी केली.

बागलाणच्या पश्चिम आदिवासी भागातील अजंदे येथील गरीब आदिवासी महिला सुमन गांगुर्डे (४५) या शेतीचे काम आटोपून घरी चूल पेटविण्यासाठी सरपण काढत असताना विषारी सापाने हाताला दंश केला. सुमन यांच्या मुलाने तत्काळ आईला दुचाकीने दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी एक कर्मचारी वगळता वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्वच गैरहजर होते. उपचारासाठी इतरत्र हलविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची मागणी केली. परंतु तीदेखील उपलब्ध झाली नाही. यामुळे नातेवाईक खासगी वाहनाने महिलेला सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे आदिवासी महिलेवर वेळीच उपचार झाले नाही, अशी तक्रार करत संतप्त नातेवाईकांनी सुमन यांचा मृतदेह अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात ठेवून रात्री उशिरापर्यंत ठिय्या दिला. उपचाराअभावी सर्पदंशाने मरण पावलेल्या सुमन गांगुर्डे यांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी, संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करावे अन्यथा मृतदेह उचलणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरापर्यंत जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश गुरव, हवालदार अंबादास थैल, राजेंद्र वाघ यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून संबंधित महिलेच्या कुटुंबीयांवर अन्याय होऊ  देणार नाही, तसेच आपल्या तक्रारी वरिष्ठांकडे पाठविण्यात येतील, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित

बागलाणच्या आदिवासी पश्चिम भागात १० किलोमीटर अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पाच किलोमीटर अंतरावरील गावांमध्ये उपकेंद्रे उभारली आहेत. मात्र अधिकारी आणि कर्मचारी दांडय़ा मारत असल्यामुळे गरीब आदिवासी आजही आरोग्य सेवेपासून वंचित आहेत. बागलाण तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याचा कार्यभार सक्षम अधिकाऱ्याकडे नाही. तो देवळा तालुक्यातील खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. त्यांचा अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अंकुश नसल्याचे सांगितले जाते. शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना बडतर्फ करावे, अशी मागणी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष मनोज सोनवणे यांनी केली आहे.