News Flash

पोलीस असल्याची बतावणी करून कामगारांची फसवणूक

नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.

संग्रहित छायाचित्र

नाशिक : टाळेबंदीत रोजगार हिरावला गेल्याने अनेक मजूर, कामगार स्थलांतराच्या मानसिकतेत आहेत. मुंबई, ठाणे परिसरातील शेकडो मजूर, कामगारांचे लोंढे पायी नाशिकमध्ये धडकले होते.

वाहतूक र्निबधामुळे पायी जाणाऱ्या कामगारांची पोलीस असल्याची बतावणी करत मालमोटारीत बसवून देण्याच्या नावाखाली खासगी सुरक्षारक्षकांनी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी आर. एस. मल्टिसव्‍‌र्हिस सिक्युरिटीच्या दोन सुरक्षारक्षकांना अटक करण्यात आली.

नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफुली येथे ही घटना घडली. टाळेबंदीमुळे अंबड येथील कारखाना बंद झाल्यामुळे सलमान तडवी आणि जावेद तडवी हे दोघे कामगार जळगाव जिल्ह्य़ातील यावल येथे पायी निघाले होते.

अमृतधाम चौफुलीजवळ आरएस मल्टिसव्‍‌र्हिस एजन्सीचे सुरक्षारक्षक रवींद्र गवळी (अश्वमेधनगर) आणि राजेंद्र त्रिभुवन (तारवालानगर) यांनी कामगारांना गाठले. कुठे जायचे आहे, याबद्दल विचारणा करून पोलीस असल्याची बतावणी केली. रस्त्याने जाणाऱ्या मालमोटारीत बसवून देण्यासाठी प्रत्येकी ५०० रुपयांची मागणी करून एक हजार रुपये घेतले. दोन्ही सुरक्षारक्षक पांढरा शर्ट, खाकी पॅण्ट, काळा पट्टा, खांद्यावरती बॅच अशा पेहरावात होते.

कामगार आणि सुरक्षारक्षक यांच्यात बोलणे सुरू असताना या चौकातून मार्गस्थ होणाऱ्या अपर पोलीस अधीक्षक वालावलकर यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी थांबून विचारणा केली. तेव्हा कामगारांनी जळगावला जायचे असल्याचे सांगून या पोलिसांनी आमच्याकडून हजार रुपये घेतल्याचे नमूद केले.

वालावलकर यांना संशय आल्याने त्यांनी चौकशी करून वाहतूक शाखेच्या पथकाला बोलावून घेतले. त्यांच्याकडे दोन्ही कामगार आणि दोन्ही संशयित सुरक्षारक्षकांना सोपवून कारवाईचे निर्देश दिले. नंतर या सर्वाना पंचवटी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

या संदर्भात पोलीस नाईक शिवाजी आव्हाड यांनी तक्रार दिली. आरएस मल्टिसर्विस सिक्युरिटी एजन्सीच्या सुरक्षारक्षकांनी पोलीस असल्याची बतावणी करत कामगारांना मालमोटारीत बसून देण्याच्या नावाखाली एक हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी खासगी सुरक्षारक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना अटकही करण्यात आली. जळगावला जाऊ इच्छिणाऱ्या दोन्ही कामगारांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मखमलाबाद नाका येथील निवारागृहात दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 2:07 am

Web Title: workers cheated by fake police zws 70
Next Stories
1 सराफ व्यवसाय सुरू करू द्यावा!
2 कांदा उत्पादकांची दुहेरी कोंडी
3 उद्योगांना काही अटींवर परवानगी
Just Now!
X