नाशिक : सुरगाणा तालुक्यातील झगडपाडा येथे शिवनदीला आलेल्या पुरामुळे परिसरातील २० गावांचा संपर्क तुटला आहे. नागरिकांकडून धोकादायक फरशी पुलाचा वापर करण्यात येत आहे.

सुरगाणा परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. झगडपाडासह खोकरविहिर, चिंचपाडा, चिऱ्याचापाडा, भेनशेत,देऊळपाडा, कहांडोळपाडा, उंबुरणे, खिर्डी, भाटी, वडपाडा, सागपाडा, खोबळा दिगर, वांगणपाडा, खिरपाडा या गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे बाऱ्हे येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांना नेता येत नाही. पुराचे पाणी फरशी पुलावरून ओसरेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. फरशीवर शेवाळ असल्याने काही वेळा पाय घसरून पुरात वाहून जाण्याची भीती असते. दुचाकी लाकडी दांडय़ाला बांधून डोलीसारखी पलीकडच्या काठावर नेण्यासाठी ४०० ते ५०० रुपये दुचाकीस्वारांना मोजावे लागतात. या परिस्थितीविषयी मालगव्हाणे येथे झालेल्या बैठकीत आमदार नितीन पवार यांना निवेदन देणयत आले आहे. बाऱ्हे भागात जर जोरदार पाऊस झाला तर पुराचे पाणी लवकर ओसरत नाही. बाऱ्हे तसेच अंबोडे येथील शालेय विद्यार्थ्यांंना महाविद्यालयात जाता येत नाही. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होते. बाऱ्हे ते खोकरविहीर, खिर्डी रस्त्याला झगडपाडाजवळ नदीच्या पाण्यात थोडी जरी वाढ झाली तरी फरशी पुलावरून पाणी वाहू लागते. नोकरदारांनाही अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या ठिकाणी पूल मंजूर करण्याची ग्रामस्थांनी मागणी के ली आहे.